लॉडर्स मैदानावर आयर्लंडविरुद्ध २४ जुलैपासून होणार्या चारदिवसीय कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या एकदिवसीय संघाचा सलामीवीर जेसन रॉय याची निवड केली आहे. इंग्लंडच्या विश्वविजेतेपदात महत्त्वाचा वाटा उचलल्यामुळे कसोटी संघाचे दार प्रथमच त्याच्यासाठी उघडण्यात आले आहे. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चरचे कसोटी पदार्पण मात्र लांबले आहे. ऍशेस मालिकेसाठी आर्चर तंदुरुस्त रहावा यासाठी इंग्लंड क्रिकेट मंडळाने आयर्लंडविरुद्धच्या १३ सदस्यीय संघात त्याला निवडणे टाळले आहे.
आपला सरेचा संघसाथी रॉरी बर्न्स याच्यासह रॉय इंग्लंडच्या डावाची सुरुवात करणे अपेक्षित आहे. वॉर्विकशायरचा वेगवान गोलंदाज ओली स्टोन व सॉमरसेटचा अष्टपैलू लुईस ग्रॅगरी यांनी संघात स्थान मिळविले आहे. गंभीर दुखापतीमुळे मार्क वूड चार ते सहा आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्यामुळे आयर्लंडविरुद्धचा एकमेव कसोटी सामना तसेच आगामी ऍशेस मालिकेतील बहुतांशी सामन्यांना तो मुकणार आहे. याच कारणास्तव स्टोनची चाचपणी करण्यासाठी त्याची आयर्लंडविरुद्ध निवड केल्याचे मानले जात आहे. जोस बटलर व बेन स्टोक्स यांना विश्रांती देण्यात आली आहे.
इंग्लंड संघ ः ज्यो रुट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बॅअरस्टोव, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, सॅम करन, ज्यो डेनली, लुईस ग्रेगरी, जॅक लिच, जेसन रॉय, ओली स्टोन व ख्रिस वोक्स.