>> न्यूझीलंडकडून करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर
न्यूझीलंड क्रिकेटने २०२०-२१ मोसमासाठी करारबद्ध खेळाडूंची घोषणा काल शुक्रवारी केली. भारताविरुद्धच्या कसोटी व वनडे मालिकेत शानदार प्रदर्शन केलेला अष्टपैलू काईल जेमिसन याला करारबद्ध खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला परंतु, न्यूझीलंडकडून खेळण्यास अजूनपर्यंत पात्र न झालेल्या २८ वर्षीय डेव्होन कॉनवे व डावखुरा फिरकीपटू ऐजाझ पटेल यांचादेखील करारबद्ध खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे.
करारबद्ध करण्यात आलेल्या २० खेळाडूंमध्ये सलामीवीर कॉलिन मन्रो व कसोटी स्पेशलिस्ट जीत रावल यांचा समावेश नाही. निवृत्तीची घोषणा केल्यामुळे लेगस्पिनर टॉड ऍस्टल याचा विचार करण्यात आलेला नाही. २०१७ साली न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यापासून कॉनवे याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये टी-ट्वेंटी, वनडे व चार दिवसीय सामन्यांत खोर्याने धावा जमवल्या आहेत. ऑगस्ट महिन्यापासून तो किवी संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास पात्र होणार आहे. परंतु, कराराचा कालावधी त्यापूर्वी सुरू झाल्याने कॉनवेला स्थान देण्यात आल्याचे गेविन लारसन यांनी स्पष्ट केले आहे.
करारबद्ध खेळाडू ः टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्होन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, मॅट हेन्री, काईल जेमिसन, टॉम लेथम, हेन्री निकोल्स, जेम्स नीशम, ऐजाझ पटेल, मिचेल सेंटनर, ईश सोधी, टिम साऊथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, केन विल्यमसन व विल यंग.