गोवा सरकारच्या पर्यटन खात्याच्या नवीन जेटी धोरण मसुद्याला हरकती, सूचना सादर करण्याच्या ३१ ऑक्टोंबर २०२२ या अंतिम तारखेच्या पूर्वसंध्येला दक्षिण गोव्यातील विविध भागातून दुचाकी वाहनांवरून येथील आझाद मैदानावर एकत्र आलेल्या नागरिकांनी जेटी धोरणाच्या मसुद्याला जोरदार विरोध करून जेटी धोरण मसुदा रद्दबातल करण्याची मागणी काल केली.
दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी दक्षिण गोव्यातील कासावली ते पणजीपर्यंत ३० ऑक्टोबरला वाहन रॅली करण्यास वाहतूक कोंडी होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर नकार दिला होता. तरीही, दक्षिण गोव्यातील विविध भागातून जेटी धोरणाच्या मसुद्याला विरोध करणारे नागरिक येथील आझाद मैदानावर दाखल झाले. आझाद मैदानावर आयोजित जेटी धोरण मसुदा विरोधी निषेध सभेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, बाणावलीचे आमदार वेंझी व्हीएगश, वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा, सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर, गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर व इतरांनी सहभाग घेतला.
राज्य सरकारकडून गोव्याच्या हिताच्या विरोधातील प्रकल्पांना विरोध करणार्या नागरिकांची सतावणी केली जात आहे. आझाद मैदानावर जेटी धोरण मसुद्याच्या विरोधात निषेध सभा होऊ नये म्हणून कासावली ते पणजी दरम्यान वाहन रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे, असा दावा आमदार वीरेश बोरकर यांनी केला.