वसतिगृहाच्या वाढीव शुल्काविरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणार्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या (जेएनयू) शेकडो विद्यार्थ्यांनी काल संसदेवर मोर्चा नेला. या मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईला विद्यार्थ्यांनी दाद न दिल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. यावेळी काही विद्यार्थी जखमी झाले. तर सुमारे १०० विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.
वाढविण्यात आलेले वसतिगृहाचे शुल्क सरकारकडून मागे घेण्यात यावे या मागणीसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून हे विद्यार्थी विद्यापीठ आवारात आंदोलन करीत आहेत. त्याची दखल घेण्यात न आल्याने काल विद्यार्थ्यांनी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच तेथे मोर्चा काढला होता. शुल्क वाढ मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
विद्यापीठाच्या आवारातून मोर्चा निघाल्यानंतर या मोर्चाला प्रचंड संख्येने तैनात असलेल्या पोलिसांनी लोधी मार्गावरील सफदरजंग टॉंब येथे रोखले. पोलीस अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.