जेईई आणि नीट परीक्षांबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने निर्णय घेत जेईई मेन परीक्षा १८, २०, २१, २२ आणि २३ जुलैला आणि जेईई ऍडव्हान्स ऑगस्टमध्ये होणार आहे. तसेच, वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट ही २६ जुलै रोजी घेण्याचे ठरविले आहे. सीबीएससीच्या दहावी व बारावीच्या परिक्षांबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचीही माहिती यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी दिली.
देशभरातील लाखो विद्यार्थी या परिक्षांच्या ताराखांच्या प्रतिक्षेत होते. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे याबाबत निर्णय होत नव्हता. काल केंद्रीयमंत्री डॉ. पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वरील माहिती दिली. दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेला प्रवेशासाठी ‘नीट’ आणि ‘जेईई’ मेन्स सारख्या परीक्षा देतात. आता तारखा घोषित झाल्याने त्यांना त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.
आयआयटी, आयआयआयटी आणि
एनआयटी संस्थांची फी वाढ नाही
केंद्र सरकारने आयआयटी, आयआयआयटी व एनआयटीमध्ये शिकणार्या विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा देताना चालू वर्षात या तीनही संस्थांमध्ये फी वाढ होणार नसल्याचे केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने सांगितले आहे.
एनआयटी, आयआयटी, आयआयआयटी म्हणजे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थामधील ज्या संस्था केंद्राच्या अनुदानावर चालतात त्यांच्या स्नातक पूर्व अभ्यासक्रमांसाठी १० टक्के शैक्षणिक शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण त्याची अंमलबजावणी या वर्षी करण्यात येणार नाही.
या संस्थांच्या कुठल्याच वर्गासाठी शुल्कवाढ करू नये असा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला आहे. ज्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) सरकारी खासगी भागीदारीत चालतात त्यांचीही शुल्क वाढ करू नये असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात आयआयटी संचालकांची स्थायी समिती व आयआयटी संचालक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.