पाच तास वाहतुकीचा खोळंबा
सुरक्षिततेबाबत शंका घेतल्या जाणार्या आगशीच्या जुवारी पुलावर काल दुपारी कदंब वाहतूक महामंडळाच्या बसचे टायर पंक्चर झाल्याने या मार्गावर सुमारे सात ते आठ कि. मी. अंतराच्या वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे वाहतूकीची प्रचंड कोंडी झाल्याने विशेष करून गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी जाणार्या प्रवाशांची तारांबळ उडाली. सुमारे पाच तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.
याबाबत वृत्त असे की कदंब महामंडळाची जीए ०३ एक्स ०१६४ बसचे टायर दु. अडीच वा. आगशी पुलावर अचानक पंक्चर झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. याच दरम्यान या पुलावरच अन्य एका वाहनाला अपघात झाल्यामुळे या खोळंब्यात भर पडली. परिणामी ७-८ कि. मी. अंतरात वाहनांच्या तीन तीन रांगा लागल्या. वाहतुकीवर नियंत्रण आणताना पोलीसांचीही तारांबळ उडाली. अखेर क्रेनच्या सहाय्याने धो धो पावसातच दोन्ही वाहने हटविण्यात आली. तरीही संध्या. ७ वा. पर्यंत या मार्गावरील वाहतूक मुंगीच्या गतीने सरकत होती. या घटनेमुळे वाहतूक फोंडा मार्गे वळविण्यात आली.