नव्या जुवारी पुलाचा एक पदर येत्या डिसेंबर २०२१ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. काल गोवा राज्य साधससुविधा विकास महामंडळाच्या बैठकीला उपस्थित राहून आल्यानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.
कोविड महामारीमुळे नव्या जुवारी पुलाचे काम रखडले आहे. खरे म्हणजे चालू महिन्याच्या शेवटपर्यंत या पुलाचे सगळे काम पूर्ण होणार होते मात्र कोविड महामारीमुळे आलेल्या अडचणींमुळे कामात खंड पडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
पुलाचे उर्वरित काम १९ डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकेल असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
दरम्यान, राज्यातील तीन आयआयटीआयच्या इमारतींचे बांधकाम तसेच काही विद्यालयांच्या इमारतींची दुरूस्ती व इस्पितळ इमारतींचे बांधकाम जलदगतीने हाती घेण्याचा निर्णय जीएसआयडीसीने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.