प्रकल्प अहवाल केंद्राला सादर
सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन जुवारीवरील समांतर पुलाचा व जोड रस्त्यांचा मसूदा प्रकल्प अहवाल सादर केला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी दिल्ली बाहेर असल्याने ढवळीकर यांनी वरील अहवाल पर्रीकर यांच्याकडे सुपूर्द केला. पर्रीकर तो गडकरी यांना सादर करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी सांगितले.एस. एम. भोबे अँड असोसिएटस यांनी वरील अहवाल तयार केला आहे. जोड रस्त्यांसाठी तीन मार्ग निवडले होते. पैकी एका मार्गाची निवड करून अहवाल सादर केल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी राज्य सरकारने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाला अहवाल सादर केला होता.
जुवारीवरील पुलाचे काम लवकर हाती घेण्याची गरज आहे. प्रकल्पाचा पाठपुरावा चालू ठेवला आहे. केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने राज्य सरकारला शक्य तितक्या लवकर मसूदा अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
जलवाहिन्या बदलण्याचा ४१३ कोटींचा प्रस्ताव
दरम्यान, राज्यातील जलवाहिन्या जुन्या झाल्याने त्या बदलण्याची गरज आहे. त्यामुळे परवा गुरुवारी दिल्लीत पेयजल व स्वच्छता विषयक प्रश्नावरील राज्य मंत्र्याच्या बैठकीत राज्यातील जलवाहिन्या बदलण्याच्या प्रस्तावावर सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी भर दिला.
सुमारे ४१३ कोटी रुपयांचा प्रकल्प केंद्राला सादर केला असून केंद्र सरकारच्या ‘फ्लॅक्सी फंड’ योजनेखाली गोव्याचा विचार करावा, अशी विनंती ढवळीकर यानी केंद्रीय पेयजल व स्वच्छता विषयक कारभार मंत्री बिरेंद्र सिंग यांच्याकडे केली. केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. गोव्याचा जीवनमान दर्जा उंच असल्याने त्या योजनांचा गोव्याला लाभ होऊ शकत नाही. त्यामुळेच फ्लॅक्सी फंड निधीतून सहकार्य करावे अशी मागणी ढवळीकर यानी केली आहे. वरील विषयावर झालेल्या कार्यशाळेतही मंत्र्यांनी भाग घेतला.
सध्या राज्यातील जलवाहिन्यांमध्ये वारंवार बिघाड होत असतो. त्याच्या दुरुस्तीच्या कामावर बर्याचप्रमाणात निधी खर्च होतो. त्यामुळे सर्वच जलवाहिन्या बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.