>> मुख्यमंत्र्यांचा पर्यटन खात्याला आदेश
राज्यातील किनारी भागात शॅक्स उभारण्यासाठी जुन्या आराखड्यानुसार जागेची आखणी करून द्यावी, असा आदेश पर्यटन खात्याला देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यात पर्यटन हंगामात किनारी भागात उभारण्यात येणाऱ्या शॅक्ससाठी नवीन आराखड्यानुसार जागेची आखणी करताना गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली शॅक्समालकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिना- पणजी येथील सरकारी निवासस्थानी भेट घेऊन शॅक्स उभारणीसाठी जुन्या आराखड्यानुसार जागेची आखणी करण्याची मागणी केली.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी शॅक्समालकांची विनंती मान्य केली आणि पर्यटन खात्याला जुन्या आराखड्यानुसार शॅक्स उभारणीसाठी जागेच्या आखणीचा आदेश दिला.
राज्यातील किनारी भागात शॅक्स उभारणीसाठी साधारण एक महिना उशिर झाला आहे. नवीन आराखड्यानुसार शॅक्ससाठी जागा आखणी करताना शॅक्समालक व मच्छिमार यांच्यात वाद निर्माण होऊ लागले आहेत. शॅक्स उभारणीसाठी आणखी विलंब होऊ नये यासाठी जुन्या आराखड्याचा वापर करून जागेची आखणी करण्याचा आदेश देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शॅक्स उभारणीसाठी 2 महिने विलंब झाल्याने शॅक्सव्यावसायिकांत नाराजी पसरली आहे. शॅक्स उभारणीसाठी विलंब झाला असला तरी व्यावसायिकांना निश्चित केलेली रक्कम सरकारकडे भरावी लागणार आहे. आता, जुन्या आराखड्यानुसार शॅक्स उभारण्यासाठी जागेची आखणी करून दिल्यास साधारण आठ दिवसांत शॅक्स उभारले जाऊ शकतात, असे मायकल लोबो यांनी सांगितले.
गोवा खंडपीठाने शॅकची प्रक्रिया पर्यटन हंगाम सुरू होण्याच्या 1-2 महिने अगोदर पूर्ण करण्याचा निर्देश पर्यटन खात्याला दिला होता; मात्र पर्यटन हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा काळ पूर्ण झाला, तरी शॅक वितरण प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती, असे शॅक व्यावसायिक संघटनेचे क्रूझ कार्दोज यांनी सांगितले.