जुन्ता हाउस ही पणजीतील सर्वांत जुनी सरकारी इमारत येत्या 30 दिवसात रिकामी करण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन विभागाला (जीएडी) दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने जुन्ता हाउस या बहुमजली सरकारी इमारतीची तपासणी करून सदर इमारत वापरासाठी धोकादायक बनल्याचा अहवाल सादर केला आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी या अहवालाला अनुसरून सदर इमारत 30 दिवसांत रिकामी करण्याचा निर्देश दिला असून 2 ऑगस्ट पूर्वी कृती अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे.
जुन्ता हाउस या बहुमजली सरकारी इमारतीमध्ये सरकारची अनेक खाती कार्यरत आहेत. तसेच, तळमजल्यावर मार्केटिंग फेडरेशनचे सहकार भांडार आणि खासगी दुकाने कार्यरत आहेत.
पणजी महानगरपालिकेची मार्केटमधील एक जुनी इमारत धोकादायक बनल्याने रिकामी करण्यात आली आहे. आता, ही दुसरी सरकारी इमारत रिकामी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.