जुने गोवे येथील बासिलिका ऑफ बॉम जिझस चर्चजवळच्या वारसा स्थळ जागेत केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेखाली उभारण्यात येत असलेल्या प्रस्तावित प्रकल्पाला जुने गोवे येथील स्थानिकांनी जोरदार विरोध दर्शविला असून तेथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला काल मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी जुने गोवे पंचायतीचे पंच सदस्यही यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस नेते एल्विन गोम्स हे म्हणाले की, जुने गोवे हे धार्मिक स्थळ आहे. त्याशिवाय ते एक जागतिक वारस स्थळही आहे. त्यामुळे तेथील बफर झोनमध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम केले जाऊ शकत नाही.
या आंदोलन ॲड. प्रतिमा कुतिन्हो, फादर बॉलमेक्स पेरेरा, पीटर व्हिएगस, रेव्हुलेशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारला निवेदन सादर
या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात जुने गोवे येथे सह्यांची मोहीम सुरू करण्यात आलेली असून 34 हजारांहून अधिक जणांनी सह्या केलेले एक निवेदन सरकारला सादर करण्यात आले आहे. सरकारने या प्रकल्पाविषयी कुणालाही विश्वासात घेतलेले नाही प्रकल्प जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत लढा चालूच राहणार असल्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.