सेंट झेवियर शवदर्शनाच्या तयारीसाठी स्वच्छता
उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार काल पोलीस बंदोबस्तात जुने गोवे येथील एका बेकायदेशीर इमारतीसह २५ बेकायदेशीर गाडे हटविण्यात आले. पंचायतीला विश्वासात घेऊन ही कामगिरी करण्यात आली.बर्याच काळापासून तेथे हे बेकायदेशीर गाडे व बांधकामे होती. सेंट झेवियरचे शवप्रदर्शन जवळ आल्याने वरील भागात सुशोभिकरणाचे व स्वच्छतेचे काम चालू आहे. बांधकामे पाडण्यास तेथील पंचायतीने पूर्ण सहकार्य दिल्याचे जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी सांगितले.
कायदेशीर बांधकामांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे त्या म्हणाल्या. कोण बेकायदेशीर व कोणते कायदेशीर बांधकाम हे दाखविण्यासाठी पंचायतीने मदत केल्याचे त्यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात शवप्रदर्शनाच्या तयारीसाठी घेतलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचा निर्णय घेतला होता.
जुने गोवे हे वारसा स्थळ असल्याने पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. रस्त्याच्या बाजूला बेकायदेशीर बांधकामे उभारल्याची तक्रार जुने गोवे नागरिक समिती तसेच अन्य व्यक्तिनीही केली होती. बेकायदेशीर बांधकामे पाडण्यासाठी नोटीसा देण्याची गरज भासत नसते, असे जिल्हाधिकार्यांचे म्हणणे आहे.