जुने गोवे कचरा प्रकल्पच्या कामाला गती : बाबूश

0
7

बायंगिणी, जुने गोवे येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली आहे. कचरा प्रकल्पासाठी निविदा जारी करण्यात आली असून तीन कंपन्या इच्छुक आहेत. त्या कंपन्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महसूल, कचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी विधानसभेत महसूल व इतर खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल दिली.
तिसवाडी तालुक्यासाठी बायंगिणी, जुने गोवे येथे कचरा प्रकल्प उभारला जात आहे. साळगावच्या धर्तीवर बायंगिणी येथे कचरा प्रकल्प उभारला जाणार आहे. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून पाच प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प कार्यान्वित केले जात आहेत. काकोडा येथील प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. कुंडई, पिसुर्ले या ठिकाणी कचरा विल्हेवाट प्रकल्प कार्यरत आहेत, असेही मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले.
राज्यात आपत्ती व्यवस्थापनाचे काम सर्व संबंधित खात्याच्या सहकार्याने योग्य प्रकारे केले जात आहे. आपत्ती काळात मदतीसाठी सुमारे 400 आपदा मित्र आणि 70 आपदा सखी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.


भंगार अड्ड्यांवर
कारवाईचे आदेश

महसूल खात्याकडून सर्व पार्टीशन प्रकरणे वेळेवर निकालात काढण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. महसूल सेवा डिजिटल आणि ऑनलाईन करण्यात आलेल्या आहे. शेत जमिनीमध्ये कार्यरत असलेल्या भंगार अड्ड्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कोमुनिदाद जमिनीवरील अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.