वारसास्थळ असलेल्या जुने गोवेसाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार करा, या मागणीसाठी राज्यातील इतिहासतज्ज्ञ प्रजल साखरदांडे, राजकीय नेते एल्विस गोम्स व अन्य काही जागरुक नागरिकांनी केंद्र सरकारला एक निवेदन सादर केले आहे.
युनेस्कोची मान्यता असलेल्या जुने गोवे या वारसास्थळात आता बेकायदेशीर बांधकामे उभी राहू लागली आहेत. या स्थळात बफर झोनचे सगळे नियम डावलून व उल्लंघन करून बांधकामे केली जात असताना राज्य सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वरील निवेदनातून करण्यात आला आहे. जुने गोवेसाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार करावा, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे आणि त्यासाठीच केंद्राला निवदेन सादर करण्यात आले असल्याचे एल्विस गोम्स यांनी स्पष्ट केले.