जुने कर्ज फेडण्यासाठी सरकार काढतेय नवीन कर्ज ः चोडणकर

0
121

सरकार मागील कर्ज फेडण्यासाठीच नवी कर्जे काढीत असल्याचा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी २०२०-२१ वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडताना दिलेली आकडेवारीही चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला. या अर्थसंकल्पातील आर्थिक तुटीसंबंधीची मुख्यमंत्र्यांनी दिलेली आकडेवारी चुकीची असून ती जाणीवपूर्वक चुकीची दिली असण्याची शक्यताही नाकारता येणार नसल्याचे ते म्हणाले.

अर्थसंकल्पातील आकडेवारीत तफावत असून २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीची आर्थिक तूट ही ४,६४८.६८ कोटी रु. एवढी आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ती अर्थसंकल्पात १८५६.६६ कोटी रु. एवढी दाखवली असल्याचे चोडणकर म्हणाले.

आर्थिक तूट कमी दाखवल्याबद्दल आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे अभिनंदन करीत आहे. कारण त्याचा फायदा भांडवली खर्चात वाढ होण्यात होणार असल्याचे चोडणकर म्हणाले.

प्रमोद सावंत यांनी २१ हजार कोटी रु. चा अर्थसंकल्प मांडलेला असला तरी तो प्रत्यक्षात १८ हजार कोटी रु.चाच आहे. त्यामुळे पुढील वर्षी त्यांना ३ हजार कोटी रु. च्या आर्थिक तुटीचा सामना करावा लागणार असल्याचा दावा चोडणकर यांनी केला. सरकारने मद्यावर वाढवलेल्या कराचा फटका पर्यटन उद्योगाला बसेल अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सरकारने व्यवसाय कर लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण हा कर वाणिज्य कर खाते लागू करील की पंचायती व नगरपालिका या स्थानिक संस्था असा प्रश्‍नही त्यांनी केला.

एन्ट्री प्लाझा
राज्याच्या सीमांवर एन्ट्री प्लाझाविषयी बोलताना चोडणकर म्हणाले, की सर्व राज्यांनी जीएसटी नंतर हे प्लाझा काढून टाकले आहेत. गोवा सरकार आता जीएसटीच्या युगात हे एन्ट्री प्लाझा कसे सुरू करणार. तसे केल्यास जीएसटीचा उद्देशच नष्ट होणार असल्याचे चोडणकर म्हणाले.