जुनी मापं… नवी मापं

0
16

क्षणचित्रं… प्राणचित्रं…

  • प्रा. रमेश सप्रे

ही नवी मापं केवळ जुन्या मापांची जागाच घेत नाहीत तर आपल्या जीवनाला आवश्यक असलेला माणसाचा- माणुसकीचा उबदार चैतन्यस्पर्शच नष्ट करताहेत, ही चिंतेची बाब आहे. आजच्या होम डिलिव्हरी’पेक्षा कालचं ‘टेक्‌‍ अवे’ बरं होतं असं नाही वाटत?

जानकीबाई आपल्या मुलाला समजावून सांगत होत्या, ‘तुला आठवत असेल… नव्या व्यवसायात गुंतवणूक करण्यावरून ह्यांच्यात म्हणजे तुझ्या वडिलांच्यात आणि तुझ्यात केवढा वाद झाला होता. त्यावेळी मी जे तुझ्या बाबांना सांगितले तेच आज तू आणि तुझा मुलगा यांच्यात तशीच परिस्थिती निर्माण झाल्यावर तुला सांगते- ‘काळ बदलला की विचारसरणी, दृष्टिकोन, जीवनशैली यांच्यात खूप बदल होतात. त्यावेळी आपण समजायचं असतं- जुनी मापं काळाच्या ओघात जाणारच आणि नवी मापं येणारच. आठवतंय?’
आईच्या या लांबलचक वाक्यावर विचार करत आनंद म्हणाला, ‘हो, तुझं बरोबर आहे आई! आता आम्ही जुनी मापं झालोय, नव्या मापांसाठी- नव्या पिढीसाठी संधी दिलीच पाहिजे.’

तसं पाहिलं तर हे सर्वच क्षेत्रांत खरं आहे. इंग्रजीत हा आशय व्यक्त करणारी एक अर्थपूर्ण म्हण आहे, ‘ओल्ड ऑर्डर चेंजेस यिल्डिंग (गिव्हिंग) स्पेस (प्लेस) टू दी न्यू.’ अगदी वजनमापांचाच विचार केला तर गेल्या पन्नास-साठ वर्षांत सर्वच बदललंय. पूर्वीचे पै-पैसा, आणा, रुपया हे जाऊन दशमान पद्धतीवर (डेसिमल्‌‍ सिस्टम) आधारित चलनी नाणी आली. सोळा आण्यांचा रुपया शंभर पैशांचा झाला. तसेच शेर-पायली-मण-खंडी जाऊन किलोग्रॅम- क्विंटल- टन ही मापं प्रचारात आली.

द्रवपदार्थांच्या बाबतीतही आता लीटर (मिलिलीटर) हे माप झालंय. पूर्वी गवळी दूध आणायचा आणि बहुसंख्येनं असलेल्या गरीब मध्यमवर्गीय कुुटुंबात शेर- अच्छेर- पावशेर अशा मापानं दूध द्यायचा. शेर हे माप वजन मोजायलाही वापरलं जायचं. किराणामालाच्या दुकानात साखर, चहा, गूळ अशा घन (सॉलिड) वस्तू मोजायला शेर वापरला जायचा.
विशेष म्हणजे धान्य मोजायची मापं निराळी होती. अगदी छोटी चिळवं, निळवं, कोळवं अशी चिल्लर मापं सोडली तरी चिपटं-मापटं-शेर-पाटली-मण-खंडी अशी मापं बाजारात राशीनं ओतलेलं धान्य मोजण्यासाठी वापरली जात.

यासंदर्भात एक खास गोष्ट म्हणजे ही मापं मोजताना सुरुवात ‘लाभ’ या अंकानं केली जात असे, ज्याचा अर्थ होता एक. त्याला ‘लाभ’ म्हणायचं कारण विक्रेता आणि ग्राहक या दोघांचाही लाभ (हित) त्या व्यवहारात असायचा. शिवाय धान्य मोजायची म्हणून एक लकब असायची. ‘लाभऽऽ दोनऽऽऽ तीनऽऽ चारऽऽ’ असं शेवटचं अक्षर लांबवत मोजायचं. त्यामुळे मोजणं सलग व्हायचं. शिवाय त्यात एक लय जाणवून ऐकताना बरं वाटायचं.

  • असं धान्य मोजण्याचा एक प्रसंग मोठा मार्मिक. गुरू नानक आपल्याच मस्तीत मुक्त संचार करत असत. कुणी काहीही काम सांगितलं की ते तत्परतेनं करीत असत. एकदा असेच आत्ममग्न अवस्थेत फिरत असताना एका धान्याच्या व्यापाऱ्यानं त्यांना हटकलं. तो म्हणाला, ‘आज बाजाराचा दिवस आहे. एकाच वेळी चार गिऱ्हाइकं आलीयत. एकाला तू त्याला हवं तेवढं धान्य मोजून दे.’ लगेच नानक मोजायला लागले ‘लाभऽऽ दोनऽऽ’ असं करत तेरा मापापर्यंत ठीक होतं, पण नंतर ‘तेरा… तेरा… तेरा…’च्या पुढे गिनती जाईच ना. हे पाहून त्या दुकानाच्या मालकानं नानकाला म्हटलं, ‘अरे, अशानं तू माझं दिवाळं काढशील. बंद कर ते मोजणं. तुला तेरापुढची चौदा-पंधरा अशी गिनती येत नाही का?’ यावर प्रसन्न हसत नानक म्हणाला, ‘तेरा म्हटल्यावर मला एकच अनुभव येतो- ‘मालिक ये सब तेरा है तेरा… मेरा कुछ भी नही।” नानकाची ही ध्यानावस्था व्यापाऱ्याला कळण्याच्या पलीकडची होती. असो.
  • काही वर्षांपूर्वी एका मोठ्या पक्षाचा प्रमुख म्हणून एका युवा नेत्याची निवड झाली. पक्षातील वृद्ध भीष्माचार्य- कृपाचार्य यामुळे दुखावले गेले होते. त्याच्यावर मीठ चोळलं गेलं त्या युवा नेत्याच्या उद्गारांनी- ‘हा जीवनाचा नियमच आहे. जुनी मापं जायची, नवी मापं यायची!’
  • खरंच, निसर्गातही झाडांची पिवळी पानं गळून नव्या कोवळ्या पालवीला वृक्षावर जागा करून देतात. विशिष्ट जातीचे मासे किंवा पक्षी ज्यावेळी नवजात पिल्लांसाठी खाद्य पुरेसं मिळणार नाही या आतून होणाऱ्या जाणिवेनं (इन्स्टिंक्ट) लाखोंच्या संख्येनं अक्षरशः आत्महत्या करतात. त्यावेळी जुन्यांनी नव्यांचं स्वागत आनंदानं- स्वतः मागे सरून- नव्यांसाठी जागा, संधी उपलब्ध करून करायचं असाच प्रकार असतो.
  • दोन पिढ्यांतील अंतर (जनरेशन गॅप) असा हा प्रकार नाही. जीवनाची गती बदलते. विविध क्षेत्रांत प्रगती होते. व्यवहाराचे प्रकार बदलतात. त्याचा परिणाम म्हणून असे बदल घडतात. केवळ वजन मापांचं रूपांतरण (कन्व्हर्शन ऑफ वेट्स अँड मेजर्स) असा हा बदल नसतो. त्याला जोडून एक सांस्कृतिक परिवर्तनही घडत असते, जे मानवाला, मानवतेला श्रीमंत, शांत, आनंदी बनवणारं असतंच असं नाही.
  • पूर्वी दूध घालणारा गवळी घरात नवीन बाळ जन्माला आलं की त्याच्यासाठी म्हणून अर्धंमाप दूध जास्तच घालायचा. पैसे न घेता, हे महत्त्वाचं आहे. जावई आला म्हणून आमरसाच्या मेजवानीसाठी शंभर आंबे घेतले तर आंबेवाला पाच आंबे अधिक घालायचा. परीक्षेचा निकाल लागल्यावर मुलानं चांगलं यश मिळवलं म्हणून पेढे घ्यायला गेल्यावर हलवाई आपले म्हणून दोन पेढे अधिक द्यायचा.

याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे, ते व्यवहार जिवंत व्यक्तींमध्ये होत असत. पैसे मोजताना बोटांची ऊब, हातांचा स्पर्श होई. थोडंसं अनौपचारिक (इन्‌‍फॉर्मल) बोलणं होई. आज कसं सारं पिशव्यात बंद. आपलं आपणच निवडून घ्यायचं. लक्ष ठेवायला सीसीटीव्ही कॅमेरे असतातच. सारं एकारलेलं, दुसरी व्यक्ती नकोच. सारं डिजिटल, फॉर्मल अन्‌‍ इंपर्सनल! व्यक्तीच्या भावनांच्या देवघेवीला स्थानच नाही. पैसे ‘जी-पे’ किंवा अशाच माध्यमातून दिले जातात. इकडे क्लिक, तिकडे क्लिक- मामला खतम!
ही नवी मापं केवळ जुन्या मापांची जागाच घेत नाहीत तर आपल्या जीवनाला आवश्यक असलेला माणसाचा- माणुसकीचा उबदार चैतन्यस्पर्शच नष्ट करताहेत, ही चिंतेची बाब आहे. आजच्या ‘होम डिलिव्हरी’पेक्षा कालचं ‘टेक्‌‍ अवे’ बरं होतं असं नाही वाटत?