जुना जुवारी व बोरी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवा

0
12

>> मंत्री सुदिन ढवळीकर यांची सूचना

>> दोन्ही पुलांचे आयुष्य संपत आल्याने त्यावरून वाहतूक धोकदायक

1983 साली बांधण्यात आलेला जुवारी पूल व 1986 साली बांधण्यात आलेला बोरी पूल या दोन्ही जुन्या पुलांचे आयुष्यमान आता जवळ-जवळ संपत आलेले आहे. त्यामुळे हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले ठेवणे धोक्याचे ठरू शकते, असे काल वीजमंत्री तसेच माजी सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले.

1983 साली बांधण्यात आलेला कारवार येथील काळी नदीवरील पूल काही दिवसांपूर्वी कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री ढवळीकर यांनी वरील भीती व्यक्त केली. दरम्यान, दोन्ही पुलांची दुरुस्ती केली तर ते आणखी जास्तीत जास्त पाच वर्षे तग धरू शकतील, अशीही माहिती त्यांनी पुढे बोलताना दिली.
कारवार येथील कोसळलेला पूल तसेच गोव्यातील जुुवारी पूल व बोरी पूल या तिन्ही पुलांचे तंत्रज्ञान हे एकच असून हे तिन्ही पूल हे ‘कॅन्टिलिव्हर’ पूल असल्याची माहितीही श्री. ढवळीकर यांनी पुढे बोलताना दिली. 1983 साली बांधलेल्या जुन्या जुवारी पुलाला 41 वर्षे तर 1986 साली बांधलेल्या बोरी पुलाला 38 वर्षे पूर्ण झाली आहेत.

जुवारीवर नवा पूल उभा राहिल्यावर जुना पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, एक्सप्रेस बस नव्या पुलावरून ये-जा करीत असतानाच ‘लोकल’ बसेस मात्र पणजीहून मडगावच्या दिशेने जाताना या पुलावरून धावत असतात. त्याशिवाय चारचाकी व दुचाकी वाहने व अन्य हलकी वाहनेही येण्या-जाण्यासाठी आपल्या सोयीनुसार ह्या जुन्या पुलाचा वापर करीत असतात.

मांडवी पूल केवळ 15 वर्षांनी कोसळला

1971 साली पणजीतील मांडवी नदीवर बांधण्यात आलेला पूल हाही ‘कॅन्टिलिव्हर’ पूल होता. मात्र, हा पूल अवघ्या 15 वर्षांनंतर म्हणजेच 6 ऑगस्ट 1986 रोजी कोसळल्याचे श्री. ढवळीकर यांनी सांगितले. त्या मानाने 1983 साली बांधलेला जुवारी पूल अद्याप तग धरून आहे. मात्र, 1983 सालीच बांधलेला कारवार येथील काळी नदीवरील ‘कन्टिलिव्हर’ पूल काही दिवसांपूर्वी कोसळलेला असल्याने आता राज्य सरकारने या जुन्या जुवारी पुलाबाबत योग्य तो निर्णय घ्यायला हवा, असे मत व्यक्त केले. जुवारी नदीवर नवा सहापदरी ‘केबलस्टेड’ पूल उभारण्यात आलेला असला तरी अद्याप जुन्या जुवारी पुलावरून अंशत: का होईना, पण वाहतूक सुरूच आहे.

दोन्ही पुलांबाबत चिंता

कारवार येथील पूल कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आता जुवारीवरील तसेच बोरी येथील जुन्या पुलाबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे सरकारने आता बोरी येथे नवा चौपदरी पूल उभारण्याची तयारी केली असली तरी या पुलाचे काम सुरू होऊन तो बांधून पूर्ण होण्यास बरीच वर्षे लागणार असल्याने तोपर्यंत हा जुना पूलच वाहतुकीसाठी वापरावा लागणार आहे.