केंद्रीय पर्यटन, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी चौथ्या जी-20 पर्यटन कार्यगट आणि पर्यटन मंत्रीस्तरीय बैठकीच्या तयारीचा सर्वसमावेशक आढावा काल घेतला.
या महत्त्वाच्या बैठकांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. भारत पर्यटन विभागाचे संचालक व्यंकटेशन दत्तात्रेय आणि राज्य सरकारचे जी-20 नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्ज यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
पर्यटन कार्य गटाची बैठक आणि पर्यटन मंत्रिस्तरीय बैठकीच्या रूपाने गोव्याची समृद्ध परंपरा आणि संस्कृती जगाला दाखविण्याची उत्तम संधी मिळणार आहे. बैठकीसाठी येणारे मंत्री आणि प्रतिनिधी हे एक प्रकारे ब्रँड अँबॅसेडरच असल्याचे नाईक यांनी सांगितले.
पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीला 13 देशांचे पर्यटन मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यांना गोव्याची संस्कृती आणि आदरातिथ्याचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. जी-20 प्रतिनिधींसाठी जुने गोवे चर्च आणि मंगेशी मंदिराच्या सहलीची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटन मंत्रालयाच्यावतीने गोव्यात 19 ते 22 जून दरम्यान चौथी जी- 20 पर्यटन कार्यगटाच्या मंत्रीस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांच्या अनुषंगाने, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 21 जून रोजी दोनापावल येथील राजभवनातील दरबार हॉल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्व जी-20 मंत्री आणि प्रतिनिधी योग दिनाच्या कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होतील.