जी-20च्या बैठकांत वीज सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न

0
9

गोव्यात होऊ घातलेल्या जी-20 बैठकांच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी या बैठका होणार आहेत त्या ठिकाणांबरोबरच या बैठकांसाठी येणारे प्रतिनिधी ज्या ज्या भागांना भेटी देणार आहेत अशा सर्व ठिकाणी विनाव्यत्यय वीजपुरवठा करता यावा यादृष्टीने आवश्यक ते काम गोवा विद्युत खात्याने हाती घेतले आहे.

याविषयी बोलताना शिष्टाचार सचिव व जी-20 बैठकांसाठीचे नोडल अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांनी यावेळी, जी-20 बैठकांनिमित्त गोव्यात विनाव्यत्यय वीजपुरवठ्यासाठीची सोय करतानाच नवीन स्मार्ट बचत करणारी वीज उपकरणे बसवण्यात येत आहेत. त्यामुळे गोव्यासाठी हा बदल फायदेशीर ठरणार आहे. या नव्या उपकरणांमुळे पणजी शहर उजळून निघणार असल्याची माहिती दिली. नियोजीत बैठकांच्या स्थळी ही आधुनिक वीज उपकरणे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गुणवत्तापूर्ण व विनाव्यत्यय वीजपुरवठा करण्यावर वीज खात्याचा भर असेल, असे गोवा वीज खात्याचे कार्यकारी अभियंता व ओएसडी (वीजपुरवठा) अरुण पाटील यांनी स्पष्ट केले.
जी-20 बैठकांच्या तयारीसाठी वीज खात्याचे कर्मचारी गेल्या डिसेंबर महिन्यांपासूनच काम करीत आहेत असे सांगून दोनापावला येथील राष्ट्रीय सागरी शास्त्र संस्था वसाहतीजवळील उपकेंद्रातील वीजभार हलवण्याचे महत्त्वाचे कामही हाती घेण्यात आले आहे. वीज उपकेंद्राकडे रस्ता अरुंद बनला होता आणि तेथे पादचाऱ्यांसाठी पदपथही नव्हता.

आता जवळच्या उपकेंद्राकडे हा वीजभार हस्तांतरीत केला गेल्याने या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करणे, रस्ता दुभाजक तसेच पदपथ बांधणे शक्य झाले आहे. आता पणजी शहर उजळून निघाले असून याचे सारे श्रेय हे वीज खात्याला द्यावे लागणार अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली. जी-20 बैठकानंतरही या उजळून निघालेल्या प्रकाशमय रस्त्यांच्या लाभ गोमंतकीयांना मिळणार आहे.
2004 साली जेव्हा इफ्फीचे गोव्यात आगमन झाले तेव्हा दयानंद बांदोडकर मार्ग (मिरामार ते सांता मोनिका जेटी) हा भाग उजळून निघाला होता.