जी-20च्या ऊर्जा संक्रमण कार्यकारी गटाची बैठक आजपासून

0
7

भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली चौथी ऊर्जा संक्रमण कार्यकारी गटाची बैठक (ईटीडब्ल्यूजी) 19 ते 20 जुलै दरम्यान पणजीत आयोजित करण्यात आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जी-20 सदस्य देश, विशेष निमंत्रित देश आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे 100 पेक्षा अधिक प्रतिनिधी एकत्र येणार आहेत.
चौथ्या ईटीडब्ल्यूजी बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे ईटीडब्ल्यूजीचे अध्यक्ष आणि सचिव पवन अग्रवाल असतील. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदर सिंग भल्ला, खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज आणि कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृतलाल मीणा हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या अंतर्गत सहा प्राधान्य क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत.
तंत्रज्ञानातील त्रुटी दूर करून ऊर्जा संक्रमण, ऊर्जा संक्रमणासाठी अल्प गुंतवणुकीत वित्तपुरवठा, ऊर्जा सुरक्षा आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी, ऊर्जा कार्यक्षमता, औद्योगिक कमी कार्बन संक्रमण आणि जबाबदार वापर, भविष्यासाठी इंधन आणि स्वच्छ ऊर्जेसाठी सार्वत्रिक सुलभता आणि न्याय्य, परवडणारी आणि सर्वसमावेशक ऊर्जा पारेषण ही सहा प्राधान्य क्षेत्रे आहेत.

गोव्यातील चौथ्या ईटीडब्ल्यूजी बैठकीतील चर्चा अनुक्रमे बंगळुरू, गांधीनगर आणि मुंबईतील पहिल्या तीन बैठकांवर आधारित असणार आहे. जेणेकरून न्याय्य आणि सर्वसमावेशक ऊर्जा संक्रमणास समर्थन देणाऱ्या सर्वोत्तम पद्धती, धोरणे आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन समोर ठेवले जातील आणि त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. चौथ्या ईटीडब्ल्यूजी बैठकीतील महत्त्वाची बाब म्हणजे मंत्रिस्तरीय निवेदनाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
चौथी ईटीडब्ल्यूजी बैठक दि. 20 जुलै रोजी संपणार आहे. ईटीडब्ल्यूजी बैठकांचा समारोप होणारी मंत्रिस्तरीय बैठक 22 जुलै रोजी गोव्यात पार पडणार आहे. मंत्रिस्तरीय बैठकीत जी-20 आणि इतर निमंत्रित देशांचे मंत्री आणि प्रतिनिधी सहभागी होतील. केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह हे जी-20 ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.