गोवा क्रिकेट असोसिएशनमधील (जीसीए) तपासाला आता वेगळी कलाटणी मिळाली असून गुन्हा अन्वेषण खात्याने आपल्या एका अधिकार्याला तपासाची प्राथमिक चौकशी करण्यासाठी बुधवारी (दि. ५ रोजी) पाठविले होते. सदर अधिकार्याने कथित आर्थिक व्यवहाराचे कागदपत्रे तपासली असता काही गोष्टी त्याला संशयास्पद वाटल्या. आर्थिक आणि प्रशासकीय चौकशीसाठी नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीने गेल्या महिन्याच्या १० तारखेपासून तपासणी कामकाजास सुरुवात केली होती. पर्वरी येथील जीसीएच्या प्रशासकीय कार्यालयात द्विसदस्यीय समितीचे सदस्य बिट्स पिलानीचे मुख्य वैद्द्यकीय अधिकारी राघवेंद्र के. एम. आणि सनदी लेखापाल प्रदीप लाड यांनी सर्व जरुरी कागदपत्रांची छाननी करण्याचे काम सुरू केले होते. उत्तर जिल्हा निबंधक व्ही. टी. हडकोणकर यांनी या समितीला नियुक्त केले होते.
जीसीएचे अध्यक्ष विनोद ङ्गडके आणि विद्यमान कार्यकारिणीच्या २००९ ते २०१४ या कालावधीतील आर्थिक व्यवहारात त्रुटी असल्याचे लेखापाल लाड यांनी यावेळी सांगितले. एकूण सातशे आजीवन सदस्यांकडून स्वीकारलेल्या पस्तीस लाख रक्कमेपैकी नऊ लाख रुपये भरणा केल्याची नोंद आहे. बाकी रक्कम सव्वीस लाख रुपये कोठे गेले याबद्दल तपास चालू आहे. जीसीएच्या आर्थिक व्यवहारात काही सरकारी नोकरांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आले असून त्यादृष्टीने चौकशी चालू असल्याचे लाड यांनी सांगितले. सदर गुन्हा अन्वेषण अधिका-याने संशयित कागदपत्रे ताब्यात घेतली असून त्यात तथ्य आढळल्यास जीसीएच्या पदाधिका-यांवर गुन्हा नोंद होऊ शकतो, असे त्यांनी पुढे सांगितले.
दरम्यान, जीसीएचे उपाध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी जीसीएच्या सर्व आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहाराची कसून चौकशी करावी अशी मागणी केली आहे. चौकशी समितीने विद्यमान अध्यक्ष आणि कार्यकारीणीस हजर रहाण्यासंबंधी नोटीस जारी केली आहे. दि. १४ नोव्हेंबरपर्यंत तपास पूर्ण करून सरकारला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.