जीसीएच्या अध्यक्षपदी पुन्हा सूरज लोटलीकर

0
122

>> उपाध्यक्षपदी शांबा नाईक बिनविरोध

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सूरज लोटलीकर यांची फेरनिवड झाली आहे. तसेच उपाध्यक्षपदी शांबा मोलू नाईक देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या असोसिएशनच्या चार जागांसाठी रविवार २२ सप्टेंबरला सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत निवडणूक घेण्यात येणार आहे. या चार जागांसाठी चुरशीची लढत अपेक्षित आहे.

गोवा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष लोटलीकर यांच्यासमवेत अनंत नाईक, शांबा देसाई, दया पागी यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील अनंत, शांबा आणि दया पागी यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने लोटलीकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड झाली आहे.

उपाध्यक्षपदी देसाई यांच्यासमवेत अनंत नाईक, तुळशीदास शेट्ये यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील अनंत नाईक आणि तुळशीदास यांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या मंडळाच्या सचिवपदासाठी विपुल फडके आणि हेमंत आंगले यांच्यात लढत होणार आहे. संयुक्त सचिवपदासाठी सुदेश प्रभुदेसाई आणि सय्यद अब्दुल मजीद यांच्यात लढत होणार आहे. खजिनदारपदासाठी प्रशांत फातर्पेकर आणि परेश फडते यांच्यात लढत होणार आहे. सदस्यपदासाठी रोहन गावस देसाई आणि मोहन चोडणकर यांच्यात थेट लढत होणार आहे.