आगाळी-आर्ले येथील घटना
आगाळी-आर्ले येथील इंडियन ब्युरो ऑफ माईन कॉलनीत सहाय्यक कंट्रोलर डॉ. योगेश गुलाबराव काळे (४६) यांच्या घरात काल शनिवारी पहाटे अज्ञान चोरट्यांनी घुसून जीवे मारण्याची धमकी देऊन व नंतर गुंगीच्या औषधाचा फवारा मारून घरातील ऐवज लुटण्याचा प्रकार घडला. चोरट्यांनी घरातील २.७५ लाख रुपयांचा ऐवज पळविला. हा प्रकार शनिवारी पहाटे घडला. अज्ञात बुरखाधारी चोरट्यांनी ही चोरी केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, काळे यांच्या आईला चोरट्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.डॉ. योगेश काळे यांच्या घरात सहा माणसे असून चोरांनी गुंगीचा स्प्रे मारून त्यांना गुंगीत ठेवले. योगेश व त्याची आई शकुंतला यांच्या खोल्यांतील कपाटे फोडून दोन सोन्याची मंगळसूत्र, दोन बांगड्या, दोन मोबाईल फोन व रोख तीस हजार मिळून २.७५ लाख रुपयांची चोरी करण्यात आली. एका खोलीत डॉ. योगेश व पत्नी सौ. पल्लवी, दोन मुले अमोघ व मेघाली झोपली होती तर दुसर्या खोलीत योगेशची आई शकुंतला व बहीण उषा झोपली होती. सदर कॉलनी आर्ले बगलरस्त्यालगत अंतर्गत रस्त्याजवळ आहे. या कॉलनीच्या बाजूने लोखंडी कुंपण कापून चोर आत आले. त्यानंतर चोरट्यांनी स्कू काढून खिडकीचे गज वेळगे केले व ते घरात घुसले. घरात मुलांच्या क्रिकेट बॅट्स होत्या, त्या हातात घेऊन त्यांनी झोपलेल्यांना जीवे मारण्याची धमकी दिली व नंतर गुंगीच्या स्प्रेची फवारणी केली. दरम्यान, चारही चोरटे २५ ते ३० वर्षे वयोगटातील असून ते हिंदी व मराठी बोलत होते, त्यांनी तोंडावर काळा बुरखा घातला होता, असे सांगण्यात आले.
चोर जाताना दरवाजाला बाहेरून कडी लावून परतले. चोरीमुळे घरातील मंडळी घाबरलेली होती. ही घटना पहाटे ४.३० च्या दरम्यान घडली, असे पोलिसानी सांगितले. काल सकाळी पोलिसांनी स्वानपथक आणले असता ते कुंपणापर्यंत जाऊन परतले.
तीन महिन्यांपूर्वी मडगाव व नावेली येथे सहा चोर्या याच पध्दतीने झाल्या होत्या. ही त्याच चोरांची टोळी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांच्या घरात वावरणार्या व हल्लीच घराचे च खिडक्याचे काम केलेल्या लोकांनी चोरांशी संपर्क साधण्याची दाट शक्यता आहे. मडगाव पोलीस निरीक्षक सुदेश नाईक, उपनिरीक्षक अजित उमर्ये तपास करीत आहेत. या चोरीनंतर निरीक्षक सुदेश नाईक यांनी अधिकारी व पोलीस शिपाई यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.