जीवेत्‌‍ शरदः शतम्‌‍

0
12
  • डॉ. मनाली महेश पवार

ऋतूनुसार निसर्गात व शरीरात होणाऱ्या बदलांनुसार खाणे, पिणे, वागणे यात बदल करायला हवेत. हे बदल सावकाश व क्रमाक्रमाने करावेत. सहाही ऋतूंत शरद ऋतू आरोग्याच्या बाबतीत थोडासा क्लिष्ट असतो. या ऋतूत आपलं आरोग्य सांभाळता आलं म्हणजे आपण शतायुषी होऊ.

भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण वर्षाचे सहा ऋतू मानतो. या सहाही ऋतूंत शरद ऋतू आरोग्याच्या बाबतीत थोडासा क्लिष्ट असतो. या ऋतूत आपलं आरोग्य सांभाळता आलं म्हणजे आपण शतायुषी होऊ. म्हणूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपण म्हणतो- ‘जीवेत्‌‍ शरदः शतम्‌‍।’ म्हणजे एखाद्याला शंभर शरद ऋतू बघायला मिळोत असा याचा अर्थ.

पावसाळ्यानंतर हिवाळा सुरू होण्यापूर्वी वातावरण पुन्हा गरम होते- ज्याला आपण साधारण ‘ऑक्टोबर हिट’ म्हणतो- तो शरद ऋतू. साधारण शरद पौर्णिमेपासून सुरू होतो. मराठी महिन्यांनुसार अर्धा भाद्रपद- आश्विन- अर्धा कार्तिक हा शरद ऋतूचा साधारण कालावधी आहे. पावसाची संततधार, सर्वत्र कोंदट, निरुत्साही असे वातावरण ही वर्षा ऋतूतील परिस्थिती शरद ऋतूच्या प्रारंभीही काही दिवस आढळते. नंतर हळूहळू यात बदल होऊ लागतो. काही वेळा एखादी मोठीशी सर येते, तर मध्येच पिवळेधमक ऊन पडलेले दिसते. सकाळी व सायंकाळी आकाशात वारंवार सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसू लागते. शरद ऋतूच्या पुढील काळात आकाश कायमचे ढगाळ न राहता सकाळी कडक ऊन पडते व सायंकाळी गडगडाटी पाऊस- जसं आता आपल्या गोव्यात सुरू आहे. हे वातावरण अनेक आजारांना आमंत्रण देते.

आपले आरोग्य जपण्यासाठी ऋतूनुसार निसर्गात व शरीरात होणाऱ्या बदलांनुसार खाणे, पिणे, वागणे यात बदल करायला हवेत. हे बदल सावकाश व क्रमाक्रमाने करावेत. अचानक एका दिवसात हे बदल करू नयेत. नुसते कॅलेंडर हातात घेऊन ऋतू ठरवू नयेत, तर निसर्गात होणारे बदल पाहून त्यानुसार राहण्यात, वागण्यात, खाण्या-पिण्यात आवश्यक ते बदल करावेत.
तीव्र सूर्यामुळे उष्णता अचानक वाढल्याने शरीरातील पित्त प्रकुपित होते. मात्र पावसाळ्यात वाढलेल्या वाताचे या उष्णतेने शमन होते. पावसाळ्यात मंद झालेला अग्नी हळूहळू बलवान होण्यास सुरुवात होते. त्यामुळे पचनशक्ती हळूहळू वाढते. पचनशक्ती वाढत असली तरी आहारही बेतानेच वाढवावा. शरीरातील पित्त वाढत आहे याचेही भान ठेवावे व पुढे येणाऱ्या दिवाळीमध्ये मनसोक्त फराळाचा फडशा पाडण्यासाठी प्रकुपित झालेल्या पित्ताचे रेचन करून आपला कोठा साफ करून हलका करावा.

या काळात पित्त स्वाभाविकताच वाढत असल्याने पंचकर्मापैकी ‘विरेचन’ हा उपचार करावा. आपल्याकडे वेळ असल्यास किंवा आपण जर विरेचनासाठी वेळ काढत असाल तर तज्ज्ञ वैद्याकडून पूर्वकर्म, प्रधान कर्म व संसर्जन क्रम यांचे पूर्ण आचरण करून शास्त्रोक्त पद्धतीने विरेचन करून घ्यावे.
घरातच विरेचन घ्यायचे झाल्यास पंधरा दिवसांतून एकदा एरंड स्नेह घ्यावा. आपल्या प्रकृतीनुसार वैद्याच्या सल्ल्यानेच तेलाचा डोस ठरवावा. साधारण 30 ते 60 मि.ली. प्रकृतीनुरूप सकाळी चारच्या दरम्यान गरम पाण्याबरोबर स्नेह घ्यावा. स्नेह घेतल्यावर साधारण दोन तासांनी जुलाब सुरू होतात. चांगले 4-5 जुलाब विनासायास येतात व आपोआप बंद होतात. या काळात वारंवार सुंठयुक्त गरम पाणी पिता येते. चांगले जुलाब होऊन गेल्यावर मन व शरीराला हलके वाटते. भूक लागल्यासारखी वाटते तेव्हा साधा हलका आहार सेवन करावा. पेज, मुगाचे कढण (सूप), खिचडी (भाताची) असा आहार सेवन करावा. हळूहळू आपला आहार रोजच्या आहाराकडे वळवावा. पण लक्षात ठेवा, आपण आतड्यांसाठी डिटॉक्स करत आहोत तेव्हा जडान्न, तळलेले पदार्थ, चटपटीत-मसालेदार पदार्थ पूर्ण वर्ज्य करावेत.

काही कारणांनी एरंड स्नेह घेण्यास जमत नसल्यास रोज एक चमचा एरंड स्नेह कणिकेमध्ये भिजवून त्याच्या चपात्या, भाकऱ्या करून खाव्यात किंवा अविपत्तीकर चूर्ण, त्रिफला चूर्ण, त्रिवृत्त लेह, आमलकी चूर्ण, आरग्वध मज्जा इत्यादी वैद्याच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप एखादं मृदू विरेचन द्रव्य या शरद ऋतूत चालू ठेवणे सगळ्यांसाठीच हितकर आहे. त्यामुळे या काळात आहार-विहाराइतकेच विरेचनसंशोधनाला (डिटॉक्सीफिकेशन) महत्त्व आहे.
विरेचनाने पचनक्रिया सुधारते, अग्नी दीप्त होतो, पित्ताबरोबर रक्तशुद्धी होते, त्यामुळे त्वचाविकारामध्ये विरेचन उपयुक्त ठरते. सोरायसिस, एक्जिमासारखे त्वचाविकार असलेल्यांनी विरेचन नक्की करून घ्यावे. पचनसंस्था सुधारल्यामुळे यकृताला उत्तेजना मिळते म्हणून फॅटी लिव्हर असलेल्यांनी विरेचन घ्यावे. मलावरोध, वाढलेले वजन कमी करण्याकरिता हे शारदीय विरेचन नक्की घ्यावे. वंध्यत्वामध्ये ज्यांची पित्त प्रकृती आहे व उष्णतेमुळे गर्भधारणा होत नसेल त्यांनी या काळात विरेचन नक्की घ्यावे.

  • आहार कसा असावा?
  • या काळात बाह्यतः आणि शरीरात पित्त वाढत असल्याने पित्तशामक असा मधुर, कडू व तुरट असा आहार सेवन करावा.
  • आंबट, खारट, उष्ण (तिखट) आहार सेवन करू नये.
  • अमसूल व आवळा ही द्रव्ये मात्र पित्तशामक असल्याने त्यांचे या काळात सेवन करावे.
  • धान्यांमध्ये प्रामुख्याने भात, ज्वारी, गहू यांचा वापर करावा.
  • कडधान्यांमध्ये मूग, मटकी, हरभरा, मसूर, मटार यांसारखी तुरट रसाची व मधुर अनुरस असणारी द्विदल धान्ये वापरावीत.
  • भरपूर दूध व तुपाचा वापर करावा.
  • नारळ हादेखील मधुर रसाचा, शीतल, आल्हाददायक, पित्तशमन करणारा असल्याने त्याचा भरपूर उपयोग करावा.
  • कडवट पदार्थांमध्ये कारल्याची भाजी, मेथी, मडवळ, तोंडली, गवारसारख्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.
  • त्याचप्रमाणे दुधी, बटाटा, कोहळा, घोसाळी, भेंडी, पालकसारख्या गोड-तुरट भाज्याही खाव्यात.
  • या ऋतूत पित्त वाढत असल्याने जिरे, हळद, धणे, मेथ्या, सुंठ, तमालपत्र, दालचिनी, कोकमसारख्या द्रव्यांचा वापर करावा. अन्य तीक्ष्ण-उष्ण मसाल्यांचे पदार्थ वापरू नयेत. फोडणीला इतर पदार्थांमध्ये लसूण पूर्ण वर्ज्य करावी. जिरे, कडीपत्ता, कोथिंबीर, दालचिनी, वेलचीसारख्या मसाल्यांचा फोडणीसाठी वापर करावा. शक्यतो तेलाऐवजी तुपाचा वापर करावा.
  • ड्रायफ्रूटपैकी भिजवलेले बदाम, मनुका, अंजीर, खारीक खावे.
  • तांदळाची किंवा रव्याची खीर, गव्हाचा किंवा रव्याचा शिरा, दुधी हलवा, खोबऱ्याची कारंजी, उकडीचे मोदक, मुगाचे लाडू, पेठा, गोड्या भातासारखे पदार्थ जरूर खावेत.
  • दूध हे स्निग्ध, मधुर, बल्य व मृदुरेचक व म्हणूनच पित्तशामक आहे. चांगले तापविलेले दूध चांदण्यामध्ये ठेवून मग ते पिण्यासाठी वापरणे जास्त हितावह. बदाम, खारीक, पिस्ता यांसारखी मधुर, बल्य द्रव्ये त्यात घालावीत, वेलदोडे घालावे, साखर घालावी. असे तयार केलेले दूध चांदण्यात ठेवून मग ते प्राशन करावे.
  • पिण्यासाठी गार पाणी वापरावे. हे पाणी वाळा घालून, मडक्यात ठेवून गार करून प्यावे.
  • आंघोळीसाठीही गार पाण्याचाच उपयोग करावा.

विहार कसा असावा?

  • सुती स्वच्छ वस्त्रे वापरावीत. शक्यतो पांढरे किंवा सौम्य रंगाचे कपडे घालावेत.
  • सुगंधी फुलांच्या माळा घालाव्यात किंवा चंदन, वाळा, मोगरा, गुलाब या सुगंधी व पित्तशामक फुलांपासून तयार केलेले शुद्ध अत्तर लावावे.
  • अष्टगंध, चंदन याचा टिळा लावावा.
  • रात्रीच्या पहिल्या प्रहरी चांदण्यात बसावे. पुढे मात्र 12 नंतर हवामानात गारवा येतो. दव पडायला लागतो. त्यामुळे रात्री 12 नंतर बाहेर फिरू नये.

वर्ज्य विहार

  • उन्हात, विशेषतः दुपारच्या वेळी बाहेर पडणे शक्यतो टाळावे व जायचेच झाल्यास छत्री घेऊन जावे.
  • शरीराला थकवा येईल असा व्यायाम करू नये.
  • फार कढत पाण्याने स्नान करू नये.
  • रात्री जागरण करू नये. तसेच दुपारी झोपू नये.
    अशा प्रकारे शरद ऋतुचर्येचे योग्य पालन व आचरण केल्यास नक्कीच शंभर शरद ऋतू बघायला मिळतील व तेही निरोगी.