योगसाधना – ५२७
योगमार्ग – राजयोग
अंतरंग योग – ११२
- डॉ. सीताकांत घाणेकर
व्रतनिष्ठ जीवन जगून जीवनाला सुंदर आकार देता देता मी सतत जागृत राहिलो आणि सृष्टीचे सौंदर्य, तसाच सुगंध वाढवीत राहिलो तर भगवान आपल्या भरवशावर शांतपणे झोपू शकेल. आपले योगसाधक अशाप्रकारे जीवन जगत असतीलच.
आजचा काळ हा विश्वप्रगतीचा काळ आहे. विविध क्षेत्रात मानवाने नेत्रदीपक प्रगती केलेली आहे आणि ती गतीपूर्वक चालू आहे, ही अत्यंत आनंदाची व अभिमानास्पद घटना आहे. ती तशीच चालू राहो…अशी आपण या दिवाळीच्या पर्वावर ईश्वराकडे मनापासून प्रार्थना करू या.
आपल्याला विविध क्षेत्रातील ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे कारण आज मानवासमोर विविध समस्या निर्माण होत आहेत- कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक…. याचबरोबर ‘नैसर्गिक’ तर आहेतच. सध्या भूकंप, वादळे, अतिवृष्टी, दुष्काळ यांसारख्या घटना वाढतातच आहेत. पण मुख्य भयंकर व महाभयानक समस्या म्हणजे कोविड-१९. एवढासा विषाणू पण भयंकर हुशार. पदोपदी स्वतःत बदल करतो. नवनवे स्ट्रेन्स तयार करतो. त्यामुळे लसीचा उपयोग किती होईल हे कळत नाही.
एक गोष्ट खरी की वैज्ञानिकांचे मनोबल कौतुकास्पद आहे. त्यांनी आवश्यक अभ्यास व शोध चालूच ठेवले आहेत. त्यामुळे विषाणूबद्दल नवनवीन ज्ञान क्षणोक्षणी उपलब्ध होत आहे. त्याचप्रमाणे प्रतिकार करण्याचे नवनवे उपक्रम चालू आहेत, ही अत्यंत भूषणावह व आशादायक गोष्ट आहे. त्याचवेळी सामान्य मानव ज्याला हे सर्व ज्ञान नाही, तो भयभीत होतो, नाराज होतो. म्हणून वेळोवेळी हे ज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचायला हवे.
एक गोष्ट खरी की अशा समस्यांसाठी एक आवश्यक म्हणजे रोगप्रतिकार-शक्ती व आत्मप्रतिकार शक्ती वाढवणे. त्यासाठी सहज, सोपी गोष्ट म्हणजे आहार- विहार, आचार-विचार. म्हणूनच योगसाधनेत आपण याचाच शास्त्रशुद्ध अभ्यास करत आहोत. त्याशिवाय सामान्य माणसाला धीर देणारी गोष्ट म्हणजे त्याचा भगवंतावरील अनन्य विश्वास व अबाधित श्रद्धा! त्यामुळेच प्रत्येक जण धार्मिक विधीत स्वतःला गुंतवून घेतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की धार्मिक विधीतील तत्त्वज्ञान जाणून घेणे अत्यावश्यक आहे. तसेच त्याची आध्यात्मिक बाजू समजायला हवी. असे केल्याने आत्मशक्तीत नक्की वाढ होईल. याच पद्धतीने सध्या आपण चातुर्मासाचा अभ्यास करत आहोत. देवशयनी एकादशीला देव झोपतो व चार महिन्यांनंतर देवउठी एकादशीला देव उठतो. या विचारामागील तत्त्वज्ञान आपण बघत आहोत.
विविध महापुरुषांबरोबर पांडुरंगशास्त्री आठवले अशा विषयांवर सखोल चिंतन करतात. त्यांचेच विविध दृष्टिकोन आपण पाहिलेत. आता थोडे वेगळे विचार बघू या… ते म्हणतात –
१. माणूस जसा थकून झोपी जातो तसाच कधीकधी कंटाळूनही झोपी जातो. अनेकवेळा मुले आईवडिलांनी सांगितलेले ऐकत नाहीत. ती फार हट्टी, जिद्दी असतात. अनेकवेळा विविध तर्हेने समजावूनदेखील ज्यावेळी मुले आपल्याच विचारांप्रमाणे वागतात तेव्हा रागाने व नाइलाजाने पालक म्हणतात, ‘‘तुला योग्य वाटते ते कर.’’ केव्हा केव्हा असे बोलून ते झोपी जातात.
शास्त्रीजी असा विचार मांडतात की तसे तर भगवंताचे मानवाच्या बाबतीत होत नसेल ना?
तसे बघितले तर हा विचारही योग्य वाटतो कारण विश्वाकडे नजर फिरवली तर सहज लक्षात येईल की आजच्या बहुतेक व्यक्ती भगवंताला मानतात, त्याची मनोभावे पूजादेखील करतात. पण ह्या सर्व गोष्टी फक्त कर्मकांडात्मक व मुख्य म्हणजे भीतीपोटी केल्या जातात. त्यामागील तत्त्वज्ञान व भाव समजत नाही.
आपण गीतेवरदेखील विचार केला, तर हा मुद्दा सहज पटेल. गीतेत भगवंत अर्जुनाला सांगतात, ‘मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः|’
- मनुष्य तो आहे की जो माझ्या मार्गाचे अनुसरण करतो. आता अभ्यासू मनुष्याच्या मनात असा विचार यायला पाहिजे की ‘माझा मार्ग’ असं भगवंत म्हणतात तर तो मार्ग कोणता? कुठला?
पू. पांडुरंगशास्त्री अगदी सोप्या, साध्या, सरळ भाषेत सांगतात- त्याचा मार्ग म्हणजे – सत्यं शिवं सुंदरम्! हे तीन पवित्र शब्द आम्हाला नक्की माहीत आहेत.
सत्यं – अत्यंत आवश्यक शब्द. मानव विकासासाठी तसाच विश्वविकासासाठी. आपण म्हणतोसुद्धा ‘सत्यमेव जयते’. आपल्या कोर्टात तर न्यायाधीशाच्या मागे हे घोषवाक्य दिसते. पण दुर्भाग्याने मानव सत्य बोलण्याची शपथ घेतो पण असत्यानेच वागतो. आणि यामध्ये काही वकीलदेखील सामील असतात. अर्थात यालाही पुष्कळ अपवाद आहेत.
म्हणूनच शास्त्रकार पुढे सांगतात – * ‘सत्य सामर्थ्यमेव जयते.’
सत्याबरोबर मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक,…. या पैलूंचे सामर्थ्य लागते.
आपल्या संस्कृतीत तर अनेक उदाहरणे आहेत, जिथे व्यक्ती सत्याच्या मार्गाने जाताना दिसतात. उदा. – पांडव. ज्यांना सत्य व धर्माच्या बाजूने असल्यामुळे शेवटी श्रीकृष्णांनी विजय मिळवून दिला.
- राजा हरिश्चंद्र – त्यांना तर ‘सत्यवादी’ ही उपाधी दिली जाते. महर्षी विश्वामित्रांना स्वप्नात दिलेल्या वचनपूर्तीसाठी ते सत्यमार्गाने गेले. त्यांच्या कुटुंबालादेखील अत्यंत कष्टात व दुःखात दिवस कंठावे लागले. पण पत्नी तारामती व पुत्र रोहिदास यांनी त्यांनाच सहकार्य दिले. शेवटी महर्षींना हार मानावी लागली व हरिश्चंद्राचा जय झाला.
अशा गोष्टी ऐकल्या, वाचल्या तर देवावरील श्रद्धा वाढून व्यक्ती सत्य मार्गाने जायला सहज प्रवृत्त होते.
शिवं – म्हणजे कल्याणकारी. भगवान सर्वांचेच कल्याण करतो. तोच मार्ग आपण अनुसरायला हवा. स्वकल्याण व विश्वकल्याण सहज साधेल.
सुंदरम् – भगवंताचा मार्ग सुंदर आहे. त्या मार्गाने जाताना मनाला सर्व तर्हेचा आनंद मिळतो- आत्मानंद, ब्रह्मानंद…
जे सुख-शांती-आनंद मिळवण्यासाठी आपण वणवण फिरतो, तो आनंद भगवंताच्या मार्गाने गेल्याने अगदी सहज प्राप्त होतो.
शास्त्रीजी मजेने म्हणतात – भगवंताच्या कंटाळ्याचे हेदेखील कारण असू शकते. म्हणूनच कदाचित ‘न श्रोस्यसि विनङ्क्ष्यासि’ असे म्हणून एकरूप झालेला आहे.
खरेच, सूक्ष्म विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की भगवंताने अशा तर्हेने झोपी जाणे हा आत्मनिरीक्षणाचा विषय होऊ शकेल.
- पू. शास्त्रीजी असेही म्हणतात की प्रवर्तमान विषयात रस नसला तरीही माणूस झोपतो. याचा अनुभव तर प्रत्येकाला अगदी पावला-पावलागणिक येतो.
उदा. गंभीर विषयावरील प्रवचन ऐकताना अथवा निरस असा नाटक/सिनेमा बघताना अनेक व्यक्ती झोपतात.
आपले मानवी जीवनदेखील असे निरस होण्याची शक्यता असते कारण दर दिवशी तोच कार्यक्रम- सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. कुठलाही मोठा बदल नाही. आयुष्यात नवीनता व आकर्षकता सहसा दिसत नाही. अशा यांत्रिक नीरस जीवनामुळे देव झोपला असेल का?
आपणही अशा जीवनाला कंटाळतो त्यामुळे थोडा बदल घडावा म्हणून आपण प्रवास, तीर्थयात्रा करतो. निसर्गरम्य ठिकाणी जातो. सुट्टी असताना मनाला विरंगुळा मिळतो. आराम मिळतो. परत आल्यावर आपण नव्या जोमाने काम करू शकतो.
म्हणून शास्त्रीजी छान मुद्दे पुढे आणतात –
१. भगवंताची निद्रा आपल्यावरील त्याच्या विश्वासामुळे असेल तर ती अतिशय उत्तम गोष्ट आहे.
२. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी भगवान झोपलेला असेल तर त्यातही सुगंध आहे.
३. आपण दृढ संकल्प केला पाहिजे की भगवंताची झोप, परिश्रम, कंटाळा, त्रास, नीरसता, एकाकीपणा… यामुळे आलेली नसावी.
४. त्यासाठी आपले जीवन व्रतनिष्ठ बनायला हवे. कदाचित म्हणूनच चातुर्मासात सर्वांत अधिक व्रते असावीत.
५. व्रतनिष्ठ जीवन जगून जीवनाला सुंदर आकार देता देता मी सतत जागृत राहिलो आणि सृष्टीचे सौंदर्य, तसाच सुगंध वाढवीत राहिलो तर भगवान आपल्या भरवशावर शांतपणे झोपू शकेल.
आपले योगसाधक अशाप्रकारे जीवन जगत असतीलच. (संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे ‘संस्कृती पूजन’)