>> ख्यातनाम प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास यांचे डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात प्रतिपादन; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
जीवनाची सफर सुंदर, अर्थपूर्ण, हेतूपूर्ण, फलदायी बनवायची असेल, ती जबाबदारी स्वतःची आहे, ती दुसऱ्यावर सोपवून मोकळे झाल्यास निराशा पदरी पडेल. यशामागे धावण्याची गरज नाही, ते फुलपाखरा मागे धावण्यासारखे आहे. त्यापेक्षा फुलांची बाग बनवा; फुलपाखरे आपोआप येतील. यश महत्वाचे; परंतु नातेसंबंध त्याहून अधिक महत्वाचे असतात, असा मूलमंत्र ख्यातनाम प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास यांनी आज डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात दिला.
कला संस्कृती संचालनालयातर्फे आयोजित चौदाव्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवाला काल कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात गोपाल दास यांच्या व्याख्यानाने प्रारंभ झाला. ‘नातेसंबंध आणि जीवन’ या विषयावर त्यांनी प्रेरणादायी विचार मांडून खचाखच भरलेल्या श्रोत्यांना भारून टाकले.
सुरुवातीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे, कला-संस्कृती खात्याचे सचिव सुनील अंचिपका, कला संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप व गौर गोपाल दास उपस्थित होते.
व्याख्यान देण्यापेक्षा संवाद महत्त्वाचा, असे सांगून गोपाल दास हे मंचावरून खाली उतरले आणि आणि श्रोत्यांशी संवाद साधला. त्यांनी हसत, खेळत, विनोद करत, विवेचनाला समर्पक गीते म्हणत आपले व्याख्यान दिले. उत्तरोत्तर श्रोत्यांकडून त्यांना चांगली दादही मिळाली.
कॉर्पोरेट क्षेत्र सोडून अध्यात्माकडे आपण का वळलात? असा प्रश्न श्रोत्यांकडून गौर गोपाल दास यांना प्रश्नोत्तरावेळी विचारण्यात आला. त्यावर ते उत्तरले, ‘तिथे तणावाखाली काम करावे लागते. मला त्या कामात आनंद वाटला नाही; मात्र आमचे पौराणिक ग्रंथ, अध्यात्म यात मला रुची निर्माण झाली. आणि मी ह्या प्रेमात पडलो. प्रेमात पडतो तो पुढचा थोडाच विचार करतो?’ त्यावर सभागृहात हशा पिकला. चूक होणे ही प्रकृती आहे, ती स्वीकारणे ही संस्कृती आहे आणि त्यातून सुधारणे ही प्रगती आहे, असेही ते म्हणाले.
गोवा ही कलाकारांची भूमी आहे, तशीव ती विचारवंतांची भूमी आहे. डी. डी. कोसंबी यांच्यासारखे थोर विचारवंत येथे निर्माण झाले. या विचार महोत्सवासाठी श्रोत्यांना बोलवावे लागत नाही, ते आपणहून येतात व आतुरतेने वाट पहात असतात हे या महोत्सवाचे यश आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.