- अनुराधा गानू
(आल्त-सांताक्रुझ, बांबोळी)
आपल्याजवळ असलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्यातरी कुठे असतात? त्यात अनेक लोकांचा… अगदी किडे-मुंग्यांचासुद्धा वाटा असतोच. ते ते लोक येऊन आपापला वाटा घेऊन जातात आणि त्या त्या वेळी ते देण्याची बुद्धी आपल्याला आपोआप होते. कारण त्यामध्ये त्यांचा वाटा असतो. म्हणून म्हणते, ‘हे माझं, ते माझं’ असं करू नका.
बर्याच वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा मी शाळेत जाणारी मुलगी होते. आमच्या जवळच्याच घरात एकदा चोरी झाली. चोरी म्हणजे काय… मोठा दरोडा- बिरोडा नव्हे हं. आणि तसंही मोठी चोरी किंवा दरोडा घालून आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या घरी त्या चोरांना मिळणार तरी काय होतं? त्या काळात तर चोरी म्हणजे काय- तर त्यांच्या घरात वरवरच कुठेतरी ठेवलेली छोटीशीच पण सोन्याची कर्णफुले कोणीतरी नकळत उचलून नेली. तेव्हा त्यावरून एकदा माझे वडील म्हणाले, ‘‘एक तर आपल्या वस्तू आपण नीट ठेवाव्यात, म्हणजे दुसर्याला त्या चोरण्याचा मोहच होणार नाही आणि असंही ती कर्णफुलं ज्याच्या वाट्याची, ज्याच्या नशिबात होती.. त्यानं नेली’’. कारण एरवी आपल्याजवळ असलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्यातरी कुठे असतात? त्यात अनेक लोकांचा… अगदी किडे-मुंग्यांचासुद्धा वाटा असतोच. ते ते लोक येऊन आपापला वाटा घेऊन जातात आणि त्या त्या वेळी ते देण्याची बुद्धी आपल्याला आपोआप होते. कारण त्यामध्ये त्यांचा वाटा असतो.
तसेच आपल्या पैशात ज्यांचा ज्यांचा वाटा असतो ते ते त्यांचा वाटा घेऊन जातात. आता हेच बघा ना.. रोज रोज आपल्याकडे येणारी आपली कामवाली.. आपल्या घरी ती भांडी घासते, घराची झाडलोट, साफसफाई अगदी सगळं करते. अगदी खूप स्वच्छ काम करते असंही नाही. आपण रोज काही ना काही तक्रारी तिच्याबद्दल करतच असतो. पण तरीही तिला काढून टाकायचा विचारही आपण करत नाही. एकतर ती करते तेवढं काम आपल्याला झेपणार नाही (आता कोरोनामुळे करावंच लागतंय, पण एरवी कठीण). आणि दुसरं म्हणजे आपल्याला मिळणार्या पैशात तिचा वाटा असतोच. तो तर तिला द्यायलाच पाहिजे. कारण तेवढ्या त्या पैशावर आपला हक्क नसतोच. आपल्याला लागणार्या सामानाचा दुकानदार, भाजीवाला, आपल्याला दूध पुरवणारा दूधवाला अशा सगळ्यांचा आपल्या पैशात वाटा असतो ते ते घेऊन जातात. तसंच आपल्या संपत्तीचं. अशी अनेक माणसं आहेत जे आपल्याकडील संपत्तीपैकी काही भाग एखाद्या अनाथ बालकाश्रमाला, अनाथ वृद्धाश्रमाला देणगी म्हणून देतात. अर्थात त्यात त्यांचा चांगुलपणा, मनाचा मोठेपणा तर दिसतोच पण त्याचबरोबर त्यांच्या संपत्तीमध्ये त्या अनाथ बालकांचा, अनाथ वृद्धांचा वाटा असतोच ना. तो त्यांना या ना त्या रुपाने मिळून जातो. ही झाली मोठी माणसं. पण सामान्य माणसंसुद्धा दुसर्याच्या मदतीसाठी आपल्या पैशातला वाटा देत असतातच.
काही वेळेला धान्याचा साठा आपण करतो. एखाद्या वेळेला ‘भिंक्षां देही’ म्हणत एखादा भिक्षेकरी आपल्या दारात येतो, त्यातलेच थोडे धान्य त्याला देऊन आपण त्याची गरज भागवतो. पूर्वी सकाळी सकाळी ‘वासुदेव’ नावाचा एक माणूस भजनं, गाणी म्हणत गावात फिरत असे आणि बहुतेक घरातील गृहिणी त्याच्या झोळीत तांदूळ किंवा धान्य घालतच असत. आपल्या धान्यातला वासुदेवाचा वाटा तो येऊन घेऊन जाई. आम्हीसुद्धा लहानपणी वासुदेवाचा आवाज आला की काहीतरी त्याला द्यायला आणण्यासाठी आईकडे धाव घ्यायचो. पूर्वी बर्याच ठिकाणी गरीब विद्यार्थी एकत्र राहात आणि एकेकजण वाड्यातल्या घरांमधून माधुकरी मागत. लोकही त्यांना ताजं जेवण देत असत. याचाच अर्थ त्या त्या घरामधल्या अन्नामध्ये त्यांचा वाटा असायचाच.
तसंच आपल्या वेळेचं आहे. आपला वेळ तरी संपूर्ण आपला कुठे असतो? अनेक जणांचा वाटा त्यात असतो. तो तर द्यावाच लागतो. शिक्षकांना आपल्या वेळेतला काही वेळ विद्यार्थ्यांना द्यावा लागतो. डॉक्टरांना आपल्या रुग्णांना वेळ द्यावा लागतो. आपल्याकडे असे अनेक लोक आहेत की जे लोक आपला सगळाच वेळ दुसर्यांना देऊन टाकतात. आपल्याकडे कितीतरी अनाथ महिलाश्रम आहेत, वृद्धाश्रम आहेत आणि बालकाश्रमसुद्धा आहेत. हे चालवणारे आपला सगळाच वेळ त्या निराधार महिलांना, वृद्धांना, अनाथ बालकांना देत आहेत. अगदी उदाहरणेच द्यायची झाली तर … महिलाश्रमाचे पावसकर गुरुजी, कुडाळचे बबनकाका परब, छत्रछाया वृद्धाश्रमाचे दादा बांदेकर, आयशा शिरोडकर, मातृछायेच्या मंदाताई पाटील, संजीवनीच्या आशाताई सावर्डेकर… अशी कितीतरी नावं घेता येतील. त्यांनी आपला सगळाच वेळ त्या वृद्धांना, बालकांना दिलाय. त्यांना मिळालेला त्यांच्या वाट्याला येत नाहीयेय.
इतकंच कशाला… आपल्याला परमेश्वराने, नियतीने दिलेलं आयुष्य तरी सगळं आपलं कुठं असतं? आपल्या आयुष्यातला काही वाटा किंवा कुणाकुणाचे तर सबंध आयुष्यच दुसर्यांसाठी असतं. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह, राजगुरू, मंगल पांडे, बाबू गेनू यांनी आपल्याला मिळालेलं सगळं आयुष्यच देशाला अर्पण केलं. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महादेव रानडे, अण्णासाहेब कर्वे यांनी आपलं सगळं आयुष्य स्त्रियांच्या उन्नतीसाठी खर्ची घातलं. बाबा आमटे यांनी आपलं आयुष्य कुष्ठ रोग्यांना समर्पित केलं तर त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत विकास आमटे, प्रकाश आमटे यांनी आपलं आयुष्य कुष्ठरोगी आणि आदिवासींना दिलं. सिंधुताई सपकाळांनी अनाथ मुलांसाठी आपलं आयुष्य वेचलं.
इतकंच नव्हे तर आपण पाळलेल्या प्राण्यांचासुद्धा आपल्या पैशात, आपल्या अन्नात, आपल्या वेळेत, आपल्या आयुष्यात, आपल्या प्रेमात वाटा असतोच आणि तो ते घेतातच.
म्हणून म्हणते, ‘हे माझं, ते माझं’ असं करू नका. कारण तुम्हाला मिळालेलं सगळं तुमचं नसतंच!