जीवनमुक्ती

0
4

योगसाधना- 684, अंतरंगयोग- 270

  • डॉ. सीताकांत घाणेकर

तू इतकी वर्षं रोज सत्संगाला येतोस पण जीवनाचा सार तुला समजला नाही. तू सत्संगामध्ये ऐकलेले ज्ञान सर्वांना ऐकवत होतास त्यावेळी तो पोपटदेखील ते आत्मसात करीत होता. यापुढे तूदेखील ज्ञानाचे मनन, चिंतन कर. मानवी जीवनाचा बोध घे.

सृष्टिकर्त्याने सुंदर, अतिशय मोहक अशी सृष्टी बनवली. निसर्गाच्या विविध साधनांनी नटवली, सजवली. नदी, नाले, सागर, महासागर असे पाण्याचे स्रोत, वृक्ष-वेली, फुले-फळे यांमुळे ती आणखी समृद्ध झाली. निळ्या आकाशामुळे तर धरतीची सुंदरता आणखीनच वाढली. त्याचबरोबर त्यात अनेक तऱ्हेचे जीव-जंतू, कृमी-कीटक, प्राणी, पशू, पक्षी, जलचर निर्माण केले. तसेच अत्यंत बुद्धिमान असा एक प्राणी- मानव- निर्माण केला. सगळे प्राणी भगवंताचे आवडते; पण त्यांमध्ये मानव विशेष जवळचा म्हणून त्याला उच्च कर्तृत्वशक्ती दिली. सृष्टीला व्यवस्थित सांभाळायची- मुख्यत्वेकरून निसर्गातील सर्व घटक- जबाबदारी त्याची.
मानव आपली बुद्धी वापरून जगू लागला. त्यातील काही व्यक्तींनी भगवंताच्या इच्छेप्रमाणे आचरण केले, तर इतरेजन आपल्या मर्जीप्रमाणे वागायला लागले- जणू काही ते सृष्टीचे मालकच. त्यामुळे त्यांनी इतर प्राण्यांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागवायला सुरुवात केली. उदा. पाळीव प्राण्यांबरोबर हिंस्र पशूंना पिंजऱ्यात कोंडून ठेवले, सर्कशीसाठी त्यांचा उपयोग केला. पक्ष्यांनादेखील पिंजऱ्यात कोंडून ठेवले. माशांना मत्स्यालयामध्ये बंदिस्त केले.

खरे म्हणजे या सर्व प्राण्यांचा मुक्त फिरणे, उडणे, पोहणे हा अधिकार होता. अशाच प्रकारे आपण पोपटालाही बंदिस्त करतो. मरेपर्यंत बिचाऱ्याला एका छोट्याशा पिंजऱ्यात कोंडून ठेवतो. त्याला आवडतात ती फळे, पाणी देतो व तो सुखात असल्याची कल्पना करतो. येथे तो खरोखर सुखी आहे का याचा कुणीच विचार करीत नाही. त्याची इच्छा असते आकाशात उडण्याची, स्वतःच्या कुटुंबाबरोबर राहायची. पण दुर्भाग्य म्हणजे माणसाची आसुरी हौस त्याच्या स्वातंत्र्याच्या आड येते.
अशाच एका पोपटाची कथा अत्यंत बोधक आहे. कथा अशी- एक श्रीमंत शेठ होता. मोठा बंगला, तीनचार गाड्या, नोकरचाकर, ड्रायव्हर… तो अगदी आनंदात राहत होता. थोडा धार्मिक प्रवृत्तीचाही होता. रोज संध्याकाळी सत्संगाला जायचा. रात्री गुरुजींनी जे सद्विचार सांगितले ते सर्व कुटुंबीयांना सांगायचा. त्याच्या व्हरांड्यातील पिंजऱ्यात त्याने एक पोपट बाळगला होता. गुरुजींनी सत्संगात सांगितलेले ज्ञान तो पोपटही कान लावून ऐकायचा. एक दिवस पोपटाने शेठजीला सांगितले- ‘साहेब, तुमचे गुरू फार ज्ञानी आहेत. त्यांना कृपाकरून विचारा की मला मुक्ती कधी मिळेल?’ त्याप्रमाणे सत्संग प्रवचनानंतर शेठजींनी गुरुजींना पोपटाचा प्रश्न विचारला. आश्चर्य म्हणजे तो प्रश्न ऐकताच गुरू बेशुद्ध झाले. सर्वांनी प्रयत्न केले व ते परत पूर्ववत झाले. शेठजींना थोडी भीतीच वाटली. त्यांच्या मनात विचार आला- ‘मी विचारलेल्या प्रश्नामुळे तर गुरुजी बेशुद्ध पडले नाहीत ना?’
शेठ घरी आल्यावर पोपटाने शेठजींना विचारले, ‘तुम्ही माझा प्रश्न गुरूना विचारला का?’ शेठजीनी घडलेली सारी हकिकत सांगितली व म्हणाले, ‘तुझे नशीबच खराब आहे. कारण गुरुजी काही उत्तर देण्याआधीच बेशुद्ध पडले!’
शेठ दुसऱ्या दिवशी परत सत्संगाला गेले. त्यावेळी गुरूनी शेठजींना पोपटाबद्दल विचारले. शेठजी म्हणाले, ‘मी पोपटाला त्याच्या नशिबाबद्दल सांगितले. ते ऐकून पोपट खाली कोसळला- अगदी मेल्यासारखा पडला. मला वाटले की पोपट मेला असणार. मी त्याला अंत्यक्रियेसाठी पिंजऱ्याबाहेर काढून ठेवले. पण आश्चर्य म्हणजे त्याने हळूच डोळे उघडले. त्याच्या जवळपास कुणीही नव्हते. मी थोडा दूर होतो न होतो तोच तो हळूच उडून गेला.’
गुरुजींनी लगेच शेठजींना म्हटले, ‘जी गोष्ट पोपटाला समजली ती तुला समजली नाही. मी बेशुद्ध झालो तो पोपटाला गुप्त संदेश होता. संसाराच्या मोहमायेच्या पिंजऱ्यात अडकून पडू नकोस. तुला कधीही मुक्ती मिळणार नाही. तू इतकी वर्षं रोज सत्संगाला येतोस पण जीवनाचा सार तुला समजला नाही. याउलट तुझा तो पोपट… तू सत्संगामध्ये ऐकलेले ज्ञान सर्वांना ऐकवत होतास त्यावेळी तो पोपटदेखील हे सर्व ज्ञान आत्मसात करीत होता. यापुढे तूदेखील ज्ञानाचे मनन, चिंतन कर. मानवी जीवनाचा बोध घे. कौटुंबिक जीवन अवश्य जग. आनंदाने रहा. सुखसमृद्धीचा अनुभव घे. पण मोहमायेत अडकू नकोस.’
कथेतील घटनांची सत्यसत्यता पाहायची नसते. फक्त बोध घेऊन जीवन जगायचे असते. आपणातील बहुतेकजण त्यांपासून बोध घेत नाहीत. यासंदर्भात पुष्कळ कथा आहेत पण आपण त्यांवर चिंतन करीत नाही.

शास्त्रकार म्हणतात ः ‘ब्रह्म सत्य, जगत्‌‍ मिथ्या याचा गर्भितार्थ बघायला हवा. ब्रह्म म्हणजे ईश्वर- तो सत्य आहे. जग मिथ्या म्हणजे क्षणभंगुर आहे.’
अनेक शुभसमयी म्हटली जाणारी एक प्रार्थना फार प्रचलित आहे-
ॐ असतो मा सत्‌‍ गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्यो र्मा अमृतंगमय
ॐ शांति शांति शांति

  • हे प्रभू, मला असत्याकडून सत्याकडे ने, अज्ञानरूपी काळोखातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे ने, मृत्यूकडून अमरत्वाकडे ने.
    या प्रार्थनेचा फक्त शब्दार्थ न बघता गर्भितार्थ, आध्यात्मिक अर्थ बघणे आवश्यक आहे. तत्त्ववेत्ते हा मुद्दा समजण्यासाठी छान संदर्भ देतात. ते म्हणतात- दुधात पाणी घातले तर ते दुधात मिसळते. त्याला दुधापासून वेगळे करता येत नाही. पण त्याच दुधापासून लोणी केले व ते पाण्यात ठेवले तर लोणी पाण्यात मिसळत नाही. लोणी वर येते आणि पाणी खाली राहते.
    आपणातील बहुतेकजण या संसारात मिसळून जातो. विकार, वासना, मोहमायेत गुरफटून जातो. शास्त्रशुद्ध साधना केली तर संसारात आनंदाने राहतो. सर्व उपभोग नैतिकतेप्रमाणे घेतो, पण संसारात गुरफटत नाही. तसाच कोळी आपले जाळे व्यवस्थित विणतो. त्यात इतर जीव अडकतात. ते त्याचे खाण असते. मात्र कोळी स्वतः जाळ्यात अडकत नाही. याउलट रेशमाचा किडा. तो आपणच विणलेल्या जाळ्यात अडकतो व त्यातच मृत्युमुखी पडतो.
    अशी अनेक उदाहरणे बोधदायक आहेत. आपल्या साधुसंतांकडून आपण हाच बोध घेऊन त्याप्रमाणे जीवन जगायचे असते- जीवनमुक्ती मिळेल.