जि. पं. निवडणूक म. गो. स्वबळावर लढणार

0
137

मगो पक्षाच्या काल पणजीत झालेल्या केंद्रीय समिती व कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हा पंचायत निवडणूक स्वबळावर लढवण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच पक्षाची घटना अत्यंत जुनी असल्याने नवी घटना तयार करण्याचा तसेच ३० मार्चनंतर पक्षाची नवी केंद्रीय समिती निवडण्याचाही ठराव संमत करण्यात आल्याचे पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
विविध धर्म व जातींच्या लोकांना पक्षात सहभागी करून घेता यावे यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याची गरज आहे, असे ढवळीकर म्हणाले.

१९ पासून म्हादई प्रश्‍नावरून जनआंदोलन
येत्या १९ रोजीपासून मगो पक्ष म्हादई प्रश्‍नावरून जनआंदोलन सुरू करणार असल्याचे यावेळी आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. १९ रोजी उस्तें-सत्तरी येथे धरणे धरून जनआंदोलनाची सुरवात करण्यात येईल. नंतर फोंडा, धारबांदोडा, डिचोली, पेडणे आदी तालुक्यातही आंदोलन करण्यात येणार असून ज्या लोकांना म्हादई व गोव्याच्या पर्यावरणाविषयी प्रेम आहे, अशा गोमंतकीयांनी मगो पक्षाच्या या आंदोलनात सहभागी व्हावे, अशी हाकही ढवळीकर यानी यावेळी दिली.

भाऊसाहेबांनी तीन धरणे
बांधल्याने मिळते पाणी
मगो पक्ष सत्तेवर असताना भाऊसाहेब बांदोडकरांनी गोव्यात तीन धरणे बांधली होती आणि म्हणूनच गोव्याला आज पाणी मिळत आहे, असे ढवळीकर म्हणाले. सांगे, केरी व पेडणे अशी तिन्ही धरणे भाऊसाहेब बांदोडकरांनी बांधली होती, असे ते म्हणाले.

मगो कार्यकारी अध्यक्षपदी
नरेश सावळांची निवड
मगो नेते व माजी आमदार नरेश सावळ यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाची केंद्रीय समिती व कार्यकारिणीच्या गुरुवारी पणजीत झालेल्या बैठकीत सदर निर्णय झाला. पत्रकार परिषदेत आमदार सुदिन ढवळीकर यांनी ही माहिती दिली. यावेळी नरेश सावळ यानी आपली पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला व पक्षासाठी आपण सक्रीयपणे काम करणार असल्याचे त्यानी सांगितले.