जिल्हा पंचायत निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष पूर्ण क्षमतेने उतरणार असून या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा विजय निश्चित असल्याचे काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरिश चोडणकर यानी सांगितले.
राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारने जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर लढवता याव्यात यासाठी कायद्यात दुरुस्ती घडवूनआणली होती त्यावेळी आम्ही या दुरुस्तीला विरोध केला होता. कारण स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका या पक्षीय पातळीवर होत नसतात. त्यामुळे आम्ही विरोध दर्शविला होता.
मात्र, सरकारने ही दुरुस्ती घडवून आणलेली असल्याने आता कॉंग्रेस पक्षाने पूर्ण क्षमतेने या निवडणुकीत आपले उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला असल्याचे चोडणकर म्हणाले.
आर्थिक मंदी, म्हादई प्रश्न, बेरोजगारी, किनारपट्टी आराखडा अशा विविध प्रश्नांवरून राज्यातील जनता सत्ताधारी भाजपावर नाराज असून जिल्हा पंचायत निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा विजय निश्चित असल्याचे काल चोडणकर यानी सांगितले.
जिल्हा पंचायत निवडणुकीसंबंधी चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने महिन्याभरापूर्वी पक्षाच्या कार्यकारिणीची एक बैठक घेतली होती, असेही चोडणकर यानी सांगितले. या बैठकीत जिल्हा पंचायत निवडणुकीसंबंधी चर्चा करून निवडणुकीसाठीची व्युहरचना तयार करण्यात आल्याचे ते म्हणाले.