जिवाशी खेळ

0
22

नीट ह्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. केंद्र सरकार आणि ही परीक्षा घेणारी एनटीए मात्र ह्या पेपरफुटीची व्याप्ती फारच कमी आहे असे सांगत सारे काही आलबेल असल्याचे भासवत आहे. खरे म्हणजे ज्या प्रकारे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी हा खेळ मांडला गेला आहे, तो अत्यंत निषेधार्ह आहे आणि कोणतीही सारवासारव न करता ह्या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोरातील कठोर कारवाई होईल हे केंद्र सरकारने पाहिले पाहिजे. राष्ट्रीय स्तरावरील जेईई आणि नीट ह्या परीक्षांची विश्वासार्हताच ह्या घोटाळ्याने पार रसातळाला गेली आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या हे प्रकरण आहे आणि ह्या पेपरफुटीची व्याप्ती तपासण्यासाठी एनटीएने शहर आणि केंद्रवार निकाल जाहीर करावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. म्हणजे फेरपरीक्षा घेण्याची गरज आहे की नाही ह्याबाबतचा निर्णय सन्माननीय न्यायालय घेऊ शकेल. केवळ झारखंडमधील हजारीबागमधील एकाच केंद्रात पेपरफुटी झाली आणि परीक्षेपूर्वी सकाळी आठ ते नऊ वीस ह्या दरम्यान पेपर फुटला असा अजब दावा एनटीएने केलेला आहे. सकाळी सव्वा दहा वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेचा पेपर केवळ तासाभरापूर्वी फुटला आणि तेवढ्या पंचेचाळीस मिनिटांच्या अवधीत परीक्षेचे एकशे ऐंशी प्रश्न सोडवून ते ह्या टोळीने दूरदूरच्या राज्यांतील संबंधित परीक्षार्थींपर्यंत पोहोचवले हे मानणेच मुळात पटणारे नाही. सरन्यायाधिशांनीही नेमके ह्याच मुद्द्यावर बोट ठेवलेले आहे. नीट परीक्षार्थींकडून लाखो रुपये घेऊन त्यांना प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरेही पोहोचवणाऱ्या टोळीचे आंतरराज्य स्वरूप लक्षात घेता ही पेपरफुटी केवळ ह्या एकाच परीक्षेपुरती सीमित आहे असे मानणेही भोळेपणाचे ठरेल. आजवरच्या किती आणि कोणकोणत्या परीक्षांमध्ये हेच तंत्र वापरले जात आले होते आणि त्याचा फायदा आजवर किती धनाढ्य पालकांनी आपल्या पाल्यांसाठी उठवला हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. एक अत्यंत सुव्यवस्थित नियोजनबद्ध अशी टोळीच ह्या प्रकरणात सक्रिय असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. असे असताना सरकार मात्र केवळ आपल्यावर बालंट येऊ नये यासाठी सारे काही आलबेल असल्याचे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. सीबीआयच्या आजवरच्या तपासातून रोज नवनवे धक्के बसत आहेत. कधी एनटीएच्या ट्रंकेतून प्रश्नपत्रिका उचलल्याचा दावा, तर कधी पाटण्याच्या आयआयएममधील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवून दिल्याचा दावा ह्यामुळे ह्या परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबतच गंभीर शंका निर्माण झाली आहे. मुळामध्ये अशा प्रकारच्या राष्ट्रीय परीक्षा ह्या केवळ शहरी धनदांडग्या पालकांचा आणि त्यांच्या पाल्यांचा विचार करून आखल्या गेलेल्या परीक्षा आहेत. खेड्यापाड्यांतील गोरगरीब होतकरू हुशार विद्यार्थ्यांच्या हुशारीला त्यात वाव नाही. महागड्या कोचिंग क्लासेसचा गोरखधंदा भरभराटीला आणण्यासाठीच ह्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षा आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या स्थानिक शिक्षण मंडळाच्या पारंपरिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे खेड्यापाड्यांतील गोरगरीब विद्यार्थी ह्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांना सामोरे जाऊच शकत नाहीत. त्यांना कोचिंग क्लासेसचा आधार घ्यावा लागतो तो ह्यामुळेच. कोचिंग क्लासेसचा धंदा मात्र ह्यामुळे भरभराटीला आला आहे. गोव्यात यंदा जेईई परीक्षेस अपात्र ठरलेल्या मुलांनाही अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र गृहित धरण्याची पाळी सरकारवर ओढवली ती ह्यामुळेच. त्यात अशा प्रकारच्या घोटाळ्यांमुळे विद्यार्थी अधिकच नाउमेद होण्याची शक्यता आहे. आज लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. येनकेन मार्गाने नीट परीक्षेतील क्रमांकाचा टिळा लावून घेऊन खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून डॉक्टर म्हणून मिरवणारी ही मुले पुढे रुग्णांच्या जिवाशी खेळ मांडतील त्याचे काय हा खरा प्रश्न आहे. आयएएससारख्या सर्वोच्च नागरी सेवा परीक्षेसंदर्भात सध्या पूजा खेडकरचे प्रकरण गाजते आहे. बड्या बड्या पदव्यांआडचे वास्तव त्यातून उजेडात आले आहे. आजकाल विदेशांमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. युक्रेन, उझबेकिस्तान यासारख्या देशांमध्ये जाऊन डॉक्टर होऊन येणारी हजारो मुले आढळतात. तेथे शिक्षणाची स्वस्ताई असली तरी त्याची गुणवत्ता काय ह्याचा विचार केला जाणेही आवश्यक आहे. डॉक्टर म्हणून विश्वासाने ज्याच्या हाती रुग्ण आपला जीव सोपवतो, त्याची पदवी कितपत विश्वासार्ह आहे अशी शंकाच जर रुग्णांच्या मनामध्ये उभी राहू लागली तर रुग्ण आणि डॉक्टर यांचे नातेच अविश्वासाने ग्रस्त होईल. रुग्णांच्या जिवाशी खेळ मांडला जाईल तो तर वेगळाच.