येत्या मार्च महिन्यात होणार्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव त्यासाठी आवश्यक तेवढा वेळ नसल्याने बाजूला ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पंचायत मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी काल दिली. मात्र, उत्तर व दक्षिण गोव्यातील मतदारसंघांची संख्या समान करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सध्या उत्तर गोव्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघांची संख्या ३० तर दक्षिण गोव्यात २० मतदारसंघ आहेत.
यंदाच्या निवडणुकीत उत्तर गोव्यात २५ व दक्षिण गोव्यात २५ अशी मतदारसंघांची समान विभागणी करण्यात येणार असल्याचे दयानंद मांद्रेकर म्हणाले. मतदारसंघांची पुनर्रचना करायची झाल्यास त्यासाठी किमान सहा महिन्यांचा अवधी लागेल. मात्र, आता या निवडणुकीसाठी तीन महिन्यांपेक्षाही कमी काळ आहे व एवढ्या कमी वेळेत हे पुनर्रचनेचे काम पूर्ण करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे काय, असे विचारले असता ही तारीख निश्चित करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असल्याचे ते म्हणाले.