जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी ४७% मतदान

0
8

>> मतदारांत निरूत्साह, मतमोजणी १८ रोजी

>> तीन मतदारसंघांतून १५ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद

दवर्ली, रेईश मागुश व कुठ्ठाळी या तीन ठिकाणी जिल्हा पंचायतीसाठी काल झालेल्या पोटनिवडणुकीत मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला. मतदानाची टक्केवारी ४६.६६ एवढी असून या अल्प मतदानाचा कुणाला फायदा मिळेल हे नक्की सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया काल या पोटनिवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांनी दिली.

काल रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झालेल्या या जिल्हा पंचायत पाटेनिवडणुकीच्या मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला. या मतदानाची टक्केवारी नंतर वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र, मतदारांमध्ये उदासीनताच दिसून आली. दुपारनंतर मतदानात आणखीच उदासीनता दिसून आल्याने शेवटी मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षाही खालीच राहिली.

मतमोजणी १८ रोजी
मतमोजणी आता उद्या मंगळवार दि. १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दवर्ली येथील जिल्हा पंचायत सदस्य असलेले उल्हास तुयेकर तसेच कुठ्ठाळी येथील अँथनी वाझ हे अनुक्रमे नावेली व कुठ्ठाळी या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य पदे रिक्त झाली होती. तर रेईश मागूश या मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्याने पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तेथीलही जिल्हा पंचायत सदस्यपद रिक्त झाले होते. या पार्श्‍वभूमीवर काल या तिन्ही जिल्हा पंचयात मतदारसंघात ही निवडणूक झाली.

दवर्लीत सर्वाधिक मतदान
वरील तिन्ही मतदारसंघापैकी दवर्ली येथे सर्वात जास्त म्हणजेच ५०.५२ टक्के एवढे मतदान झाले. त्या पाठोपाठ जास्त मतदान झाले ते कुठ्ठाळीमध्ये झाले. तेथील मतदानाची टक्केवारी ही ४५.०६ एवढी आहे. तर सर्वांत कमी मतदान हे रेईश मागूश येथे झाले. ते ४३.९४ टक्के एवढे आहे.

रेईश-मागूश येथे चौरंगी लढत
रेईश मागूशमध्ये चार उमेदवार रिंगणात आहेत. तेथे कॉंग्रेसतर्फे प्रगती पेडणेकर, आरजीतर्फे साईनाथ कोरगावकर व भाजपतर्फे संदीप बांदोडकर हे रिंगणात आहेत. तर राजेश दाभोळकर हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीत एकूण १५ उमेदवार रिंगणात होते. रेईश-मागूश येथे ४, दवर्ली येथे ७ तर कुठ्ठाळी येथे ४ उमेदवार रिंगणात होते.

कुठ्ठाळीत किरकोळ वाद
कुठ्ठाळी येथे मतदानाच्यावेळी कुठ्ठाळी मतदारसंघाचे आमदार आंतोनियो वाझ यांच्या पत्नी मार्सियाना वाझ यांच्या समर्थकांनी आपणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काल कॉंग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्ते ओलेन्सिओ सिमॉईश यांनी केला आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केले असून आपण सदर घटनेचा निषेध करीत असल्याच म्हटले आहे.

आमदार आंतोनियो वाझ यांचे समर्थक मतदान केंद्रावर थांबून मतदारांना पैसे वाटत होते. त्यांना जाब विचारला असता त्यांनी आपणावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे सिमॉईश यांचे म्हणणे आहे.

रेइश मागुश मतदारसंघात मतदानासाठी निरुत्साह

काल रविवारी रेईश मागुश जिल्हा पंचायतीची पोटनिवडणूक शांततेने पार पडली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ४५ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला नाही.

मालीम येथील बूथवर आमदार केदार नाईक यांनी मतदान केले. यावेळी भाजपतर्फे संदीप बांदोडकर, कॉंग्रेसतर्फे प्रगती पेडणेकर, अपक्ष राजेश दाभोळकर आणि साईनाथ कोरगावकर यांनी निवडणूक लढविली असून येत्या दि.१८ रोजी निकाल जाहीर होणार आहे.