कॉंग्रेस पक्षाने दोन्ही जिल्हा पंचायतींच्या ४० जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच १० जागांसाठी समविचारी पक्षांना पाठिंबा देणार आहे, अशी माहिती गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीतील महिला, ओबीसी, एसटी प्रभागाच्या राखवितेमध्ये पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी चोडणकर यांनी यावेळी केली.
सत्ताधारी गटाकडून निवडणुकीच्या वेळी विरोधकांची कोंडी करण्यासाठी प्रभाग राखविता जाहीर करण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब लावला जातो. सत्ताधारी गटाकडून त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या फायद्यासाठी शेवटच्या क्षणी प्रभाग राखविता जाहीर केली जाते. त्यामुळे विरोधकांना त्रास सहन करावा लागतो. राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना प्रभाग राखविता जाहीर करावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली. जिल्हा पंचायत निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.