>> सदानंद तानावडेंची माहिती
भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या दोन फेर्या आतापर्यंत पूर्ण केल्या असल्याची माहिती काल प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आपण स्वत: तसेच मंत्री व पक्षाचे आमदार तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने पक्षाच्या उमेदवरांसाठी प्रचार करीत असल्याचे तानावडे म्हणाले.
आपण स्वत: उत्तर व दक्षिण गोव्यातील मिळून एकूण २२ मतदारसंघांत फिरून प्रचार केल्याची माहितीही त्यांनी दिली. केंद्रात वराज्यात भाजपने केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन मतदार भाजपच्या उमेदवारांनाच विजयी करणार असल्याचा दावाही तानावडे यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेला पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार नरेंद्र सावईकर हेही हजर होते.
विरोधी पक्षाकडे मुद्दाच नाही
राज्यातील विरोधी पक्षांकडे कोणताही निवडणूक मुद्दा नसून त्यामुळे ते जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनाकारण म्हादईचा मुद्दा उपस्थित करू लागले असल्याचा आरोप तानावडे यांनी यावेळी केला.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, मगोचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर आदी नेते विनाकारण म्हादईचा मुद्दा उपस्थित करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नुकतीच नवी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी म्हादई व अन्य मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा केली असल्याचे तानावडे म्हणाले.
कॉंग्रेस व अन्य विरोधकांनी आता कोरोनावरुनही राजकारण सुरू केले असल्याचा आरोपही तानावडे यांनी यावेळी केला.