राज्यातील जिल्हा पंचायतींसाठी आज मतदान होणार असून भाजप, मगो व गोवा विकास पार्टी या युतीने उत्तर गोवा व दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायती आपल्या बाजूने खेचून आणण्यासाठी प्रतिष्ठेचा विषय केला आहे. बंडखोर अपक्षांचा प्रभाव काय असेल हे दि. २० रोजीच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होऊ शकेल.
येथील जिल्हा पंचायतींना सध्या तरी कोणतेही अधिकार नसले तरी यावेळी प्रथमच या निवडणुका पक्षीय पातळीवर घेतल्या जात असल्याने वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा पंचायतींना जादा अधिकार देण्याचा मार्ग मोकळा व्हावा, पंचायतीवर जबाबदारी असावी यासाठीच निवडणुका पक्षीय पातळीवर लढविण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मतदार बंडखोरांच्या बाजूने राहतील की पक्षाच्या बाजूने राहतील हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.निवडणुकीसाठी सज्जता
पणजी (न. प्र.)ः आज राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुका विना अडथळा व शांततेत पार पडाव्यात यासाठी आवश्यक ती सगळी तयारी करण्यात आली असल्याचे उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन् यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले.
उत्तरेत ९३ उमेदवार
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या २५ मतदार-संघांसाठी एकूण ९३ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी २३ भाजप, २ मगो व ६८ अपक्ष उमेदवार असल्याचे त्या म्हणाल्या. २५ मतदारसंघांपैकी १० मतदारसंघ हे सर्वसामान्यांसाठीचे (अराखीव) आहेत. ६ मतदारसंघ महिलांसाठी (सर्वसामान्य) आहेत. ३ मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातींसाठी १ मतदारसंघ व ओबीसीसाठी ५ मतदारसंघ राखीव आहेत.
११२१ पोलिसांची फौज
कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्यासाठी ११२१ पोलिसांची फौज तैनात करण्यात येणार आहे. निवडणुकीची जबाबदारी सांभाळण्यासाठी ६ निर्वाचन अधिकारी, ६ सहाय्यक निर्वाचन अधिकारी, ६९८ देखरेख अधिकारी व २०७३ निवडणूक अधिकारी उपस्थित असतील. निवडणुकीच्या वेळी देखरेखीसाठी ६ भरारी पथके असतील. तसेच ४ निरीक्षक असतील. एकूण मतदान केंद्रांपैकी ७ मतदान केंद्रे ही संवेदनशील असल्याचे मोहनन् यांनी सांगितले. ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्रे नाहीत त्यांना आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन कागदपत्रे आदी दाखवून मतदान करता येईल. निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याच्या बार्देशमधून केवळ ४ साध्या तक्रारी आल्या असल्याचे मोहनन् यांनी स्पष्ट केले. खाणींसाठीचे पर्यावरण दाखल्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केल्याने निवडणूक आचार संहितेचा भंग असल्याची तक्रार आली आहे काय, असे पत्रकारांनी विचारले असता अद्याप कुणी तशी तक्रार केली नसल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
सासष्टीत बाराशे कर्मचारी
जिल्हा पंचायतींच्या मतदानासाठी सर्व सरकारी यंत्रणा सज्ज असून काल सकाळपासून सासष्टीतील सर्व मतदान केंद्रात मतदान केंद्रावरील कर्मचार्यांना सामुग्रीसह पोहचविण्याचे काम करण्यात येत होते. आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होईल. काल रात्रीपासून सर्वत्र पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. काल रात्रीपासून सर्वत्र पोलीस गस्त चालू होती. सासष्टी येथे ९ मतदारसंघात १२०० कर्मचारी तैनात केले आहेत.