जिल्हा पंचायतींना अतिरिक्त १८ कोटी निधी देणार

0
124

>> मुख्यमंत्र्यांची घोषणा

>> २५ जानेवारीपासून आठ दिवसांचे अधिवेशन

राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत पंचायती व जिल्हा पंचायतींना वाढीव निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर २५ जानेवारीपासून विधानसभेचे आठवडाभराचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पर्वरीत दिली. मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंचायतींना १८ कोटी रु. एवढे अतिरिक्त अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी हजर असलेले पंचायतमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की, पंचायती व जिल्हा पंचायतींना आपल्या कार्यक्षेत्रात चांगला विकास साधता यावा यासाठी त्यांना वाढीव निधी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे पंचायती व जिल्हा पंचायतींची विकासकामे वेगाने पूर्ण होतील व परिणामी ग्रामीण विकासाला चालना मिळेल. १५व्या वित्त आयोगाने यावेळी गोव्याला विकासकामांसाठी घवघवीत असा ७५ कोटी रु.चा निधी दिलेला असून ग्रामीण गोव्याच्या विकासासाठीही या निधीचा चांगला फायदा होणार असल्याचे गुदिन्हो म्हणाले. १३व्या वित्त आयोगाने राज्याला २३ कोटो तर १४व्या वित्त आयोगाने ३४ कोटींचा निधी दिला होता.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा या योजनेखाली ग्रामीण गोव्याचा विकास करण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी कृषी खाते, पशू चिकित्सा खाते आदी खात्यांसह अन्य काही खात्यांची मदत घेण्यात येईल. ग्रामीण गोव्याचा चांगला विकास व्हावा यासाठी पंचायती व जिल्हा पंचायतींना वाढीव निधी देण्याचा जो निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे त्याचा फायदा झाल्याचे लवकरच दिसून येईल. गावागावांतील स्वच्छता अभियानलाही चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले.

मुक्तिदिन हीरक महोत्सव
कार्यक्रमाला विरोध नको

गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवानिमित्त राज्य सरकार वर्षभर जे कार्यक्रम करू पाहत आहे त्या कार्यक्रमांना कुणीही विरोध करू नये, असे काल मुख्यमंत्री सावंत यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. हीरक महोत्सवानिमित्त राज्यात बर्‍याच काही चांगल्या गोष्टी होतील असा आशावाद व्यक्त करतानाच कोविडमुळे आलेली मरगळ दूर होण्यासही या महोत्सवाचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. काही विकासकामे होतील. काही स्मृती स्थळे, किल्ले आदींची दुरुस्तीही होऊ शकेल. राज्यातील लोककलाकार, नाट्यकलाकार यांना कला सादर करता येतील. सर्वांचा फायदा होईल असे ते म्हणाले. नाताळ सण आता जवळ आलेला असून त्यामुळे गोमांस खाणार्‍या लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली.

मोले अभयारण्यात बांधकाम नाही
तमनार वीज प्रकल्पासाठी कर्नाटकमधून वीजवाहिन्या ओढण्यात येणार असून या प्रकल्पासाठी मोले अभयारण्यात कोणतेही बांधकाम उभे राहणार नसल्याचा पुनरुच्चार काल मुख्यमंत्र्यांनी केला. या प्रकल्पासाठी जे खांब उभारण्यात येणार आहेत ते खासगी वनक्षेत्रात असल्याचा खुलासा परत एकदा सावंत यांनी केला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गोव्यातील सर्व भागांना अखंडित वीजपुरवठा होईल असे सावंत यांनी सांगितले. येत्या १६ जानेवारीपासून राज्यात होणार असलेल्या इफ्फीच्या आयोजनाची तयारी सध्या जोरात सुरू असल्याची माहितीही सावंत यांनी दिली.

२५ जानेवारीपासून अधिवेशन
२५ जानेवारीपासून विधानसभेचे आठवडाभराचे अधिवेशन घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मार्च-एप्रिल महिन्यात अंदाजपत्रकी अधिवेशन होईल, असे सांगून अधिवेशनावेळी कोविडसाठीच्या एसओपीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.