सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी
आज सकाळी ८ वाजल्यापासून तालुका केंद्रांत जिल्हा पंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यंदा प्रथमच पक्षीय पातळीवर जिल्हा पंचायतींसाठी निवडणुका घेण्यात आल्याने आज होणार्या या मतमोजणीकडे तमाम गोमंतकीयांचे लक्ष वेधले आहे.वरील निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात आल्या असल्याने मतमोजणीचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत चालेल. संध्याकाळपर्यंत निवडणूक रिंगणात असलेल्या १९२ उमेदवारांचे भवितव्य उघडले जाईल. बुधवारी रात्रीपासून उमेदवारांचे समर्थक मतांचा हिशोब मांडीत होते.
सत्ताधारी भाजपने मगो व गोवा विकास पार्टी या सत्तेतील सहकारी पक्षांशी युती करून ही निवडणूक लढवली आहे. भाजपचे उत्तरेत २३ आणि दक्षिणेत ११ मिळून एकूण ३४ जागांवर उमेदवारांचे भवितव्य सीलबंद आहे. मगोतर्फे उत्तरेत २ आणि दक्षिणेत ७ मिळून ९, तर गोवा विकास पक्षातर्फे ५ उमेदवार रिंगणात असून मतमोजणीनंतर युतीची ताकद स्पष्ट होणार आहे.
मगोला दिलेल्या ९ मतदारसंघांत निकाल काय लागेल हेही अधिक महत्त्वाचे आहे.
कॉंग्रेस पक्षाने या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे केले नसले तरी त्यांनी कॉंग्रेस समर्थक उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. कॉंग्रेसच्या काही आजी-माजी मंत्री तसेच आमदारांनी प्रत्यक्ष प्रचार केला असल्याने निकालानंतर त्यांचा प्रभाव कळणार आहे.
कॉंग्रेसने हकालपट्टी केलेले सांताक्रु्रझचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी चिंबल, सांताक्रुझ व ताळगाव मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले असून तेथे कोणता निकाल लागतो याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजप, मगो व गोवा विकास पार्टीची महायुती बहुमताचा दावा करीत असले तरी त्यांच्याच पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून काही मतदारसंघांत दंड थोपटले असल्याने त्याचा परिणाम मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.