जिल्हा पंचायतसाठी भाजपचे 19 उमेदवार जाहीर

0
0

उत्तर गोव्यातून 13, दक्षिण गोव्यातून 6 नावे जाहीर

आजपासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ

भारतीय जनता पक्षाने काल आपले जिल्हा पंचायत निवडणुकांसाठीचे पहिल्या टप्प्यातील एकूण 19 उमेदवार जाहीर केले. उत्तर गोव्यातील 25 मतदारसंघांपैकी 13 मतदारसंघांतील तर दक्षिण गोव्यातील 25 मतदारांपैकी 6 मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. उर्वरित उमेदवारांची निवड उद्या मंगळवारी करण्यात येणार आहे. उर्वरित जागांपैकी काही जागा भाजप युतीचा घटक असलेल्या मगो पक्षाला देण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे गोवा प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना दिली.

काल निवडण्यात आलेले पहिल्या टप्प्यातील उमेदवार व त्यांचे मतदारसंघ खालीलप्रमाणे आहेत. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठीच्या 12 उमेदवारांची तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठीच्या 19 उमेदवारांची निवड उद्या मंगळवारी दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्यात युतीचा घटक पक्ष असलेल्या मगो पक्षाच्या उमेदवारांसाठीचाही समावेश असेल.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे पहिल्या टप्प्यातील उमेदवार खालीलप्रमाणे आहेत. कोलवाळ या महिलांसाठी राखीव असलेल्या 6 क्रमांकाच्या मतदारसंघात उमेदवार म्हणून भाजपने सपना वासुदेव मापारी यांची निवड केली आहे. आरक्षित नसलेल्या व सर्वसामान्यांसाठी (जनरल) असलेल्या शिरसई या 7 क्रमांकाच्या मतदारसंघासाठी सागर सुधाकर मावळणकर यांची निवड झाली आहे. कळंगुट या महिलांसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघासाठी भाजपने फ्रँझिला सेलीन रॉड्रिगिस या महिलेची निवड केली आहे. सर्वसामान्यांसाठी असलेल्या सुकूर या 11 क्रमांकाच्या मतदारसंघासाठी अमित देविदास अस्नोडकर यांची निवड केली आहे. तर महिलांसाठी आरक्षित असलेल्या रेईश-मागूस या 12 क्रमांकाच्या मतदारसंघासाठी उमेदवारीची माळ भाजपने रेश्मा संदीप बांदोडकर यांच्या गळ्यात घातली आहे.
पेन्ह-द-फ्रान्स ह्या बिन आरक्षित (जनरल) अशा 13 क्रमांकाच्या मतदारसंघात संदीप दत्ताराम साळगावकर यांची उमेदवार म्हणून निवड झाली आहे. 15 क्रमांकाच्या अनुसूचित जमातींसाठीच्या आरक्षित मतदारसंघासाठी रघुवीर नारायण कुंकळ्येकर यांची निवड झाली आहे. तर 17 क्रमांकाच्या खोर्ली (जनरल) या मतदारसंघासाठी सिद्धेश श्रीपाद नाईक यांची निवड करण्यात आली आहे. 19 क्रमांकाच्या लाटंबार्से (जनरल) या मतदारसंघासाठी पद्माकर अर्जुन मळीक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आलेल्या पाळी या मतदारसंघासाठी सुंदर मोर्तू नाईक, ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आलेल्या होंडा या 23 मतदारसंघात नामदेव बाबल च्यारी, अनुसूचित जातींसाठी आरक्षित करण्यात आलेल्या केरी या 24 क्रमांकाच्या मतदारसंघात नीलेश शांबा परवार, या जनरल (बिनआरक्षित) नगरगावच्या 25 क्रमांकाच्या मतदारसंघासाठी प्रेमनाथ गणेश दळवी यांची निवड करण्यात आली आहे.

दक्षिण गोवा उमेदवार
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी उसगाव – गांजे या महिलांसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघ क्रमांक 1 मध्ये समेक्षा वामन नाईक, बेतकी-खांडोळा (जनरल) या मतदारसंघ क्रमांक 2 साठी श्रमेश सुकडू भोसले, अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या कुर्टी या 3 क्रमांकाच्या मतदारसंघासाठी प्रीतेश प्रेमानंद गावकर, अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या सावर्डे या 17 क्रमांकाच्या मतदारसंघासाठी मोहन परशुराम गावकर, 20 क्रमांकाच्या शेल्डे (जनरल) या मतदारसंघासाठी सिद्धार्थ श्रीनिवास गावस यांची तर सांकवाळ (जनरल) या 24 क्रमांकाच्या मतदारसंघासाठी सुनील महादेव गावस यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाचे गोवा प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी काल दिली.