मडगाव येथील नव्या जिल्हा इस्पितळाचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होणार असून तोपर्यंत दक्षिण गोव्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. मनुष्यबळासह विविध सोयी यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अन्य ज्या सुविधांची गरज आहे त्याही पूर्ण केल्या जातील असे आश्वासन आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल विधानसभेत दिले. प्रश्नोत्तराच्या तासाला अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी हॉस्पिसियोसंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता.
हॉस्पिसियोत मनुष्यबळ व अन्य काही सुविधांच्या अभावामुळे दक्षिण गोव्यातील रुग्णांचे हाल होत असल्याचे विजय सरदेसाई यांचे म्हणणे होते. हॉस्पिसियोत किती पदे रिक्त आहेत असा सवाल त्यांनी केला असता एकूण ६७ पदे रिक्त आहेत. त्यात डॉक्टर्स, नर्सेस, वार्ड सिस्टर्स, चपरासी, चौकीदार, स्वयंपाकी, झाडूवाला आदी पदांचा समावेश आहे. निवृत्ती, पदोन्नती, राजीनामा, बदल्या आदी कारणांमुळे ही पदे रिक्त झाली असल्याची माहिती यावेळी लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली.
यावेळी बोलताना विजय सरदेसाई म्हणाले की, आरोग्यमंत्री २६ जून २०१२ रोजी हॉस्पिसियोत पाहणी करण्यासाठी गेले होते. नंतर गेल्या दोन वर्षांत त्यांनी एकदाही हॉस्पिसियोत पाय ठेवला नाही. दक्षिण गोव्यातील या जिल्हा इस्पितळाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ व रस नाही, असा आरोप सरदेसाई यांनी केला. मात्र, सदर आरोप फेटाळताना पार्सेकर म्हणाले की, त्यानंतरही त्यांनी हॉस्पिसियोची पाहणी केली आहे. आपण जाताना बरोबर पत्रकारांना घेऊन गेलो नसल्याने त्यासंबंधीचे वृत्त वृत्तपत्रात आले नसावे असे ते म्हणाले. त्यावर बोलताना तुम्ही असे लपूनछपून का जाता. गेल्यावर स्थानिक आमदारांनाही बोलवा, अशी सूचना सरदेसाई यांनी केली.
यावेळी हस्तक्षेप करताना मडगावचे आमदार दिगंबर कामत म्हणाले की नवे इस्पितळ उभे होईपर्यंत हॉस्पिसियोत सर्व सुविधा मिळतील याकडे आरोग्य खात्याने लक्ष द्यावे. सध्या तेथील कॅज्युएल्टी विभाग, पॅथॉलॉजी विभागासह अन्य काही विभागांत व्यवस्थित काम होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. रिक्त असलेली डॉक्टर्सची पदे भरण्यात यावीत. रुग्णवाहिका ड्रायव्हर्सही कमी आहेत. गरज नसताना डॉक्टर्स हॉस्पिसियोत रुग्णांवर उपचार करायचे सोडून त्यांना गोमेकॉत पाठवत असल्याचा आरोप यावेळी कामत यांनी केला.
यावर उत्तर देताना डॉक्टर्सची काही पदे भरली आहेत. आणखीही काही लवकरच भरण्यात येतील. सर्व सुविधा लवकर उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी बोलताना विजय सरदेसाई यांनी नवे इस्पितळ सुरू झाल्यानंतर हॉस्पिसियोच्या इमारतीचे काय करणार असे विचारले असता या इमारतीचे काय करायचे ते नंतर बघू. तुमच्या काही सूचना असतील तर पाठवा असे त्यांना सांगितले.