>> टीआयजीएसचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांचा सल्ला
>> धोकादायक कोरोना उपप्रकार आढळण्याची शक्यता
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत साडेचार हजारांहून अधिक कोरोनाबाधित सापडले असून, ही रुग्णसंख्या तीन महिन्यांतील सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर टाटा इन्स्टिट्यूट फॉर जेनेटिक्स अँड सोसायटी (टीआयजीएस)चे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. वाढत्या संक्रमणादरम्यान सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक बनले आहे. नवीन कोरोनाबाधितांना धोका कमी असला तरी, आजच्या घडीला जिनोम सिक्वेन्सिंग वाढवणे महत्त्वाचे आहे; कारण नवीन रुग्णांमध्ये कोरोनाचा एखादा धोकादायक उपप्रकार आढळू शकतो, अशी भीती डॉ. मिश्रा यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाचे नवनवे उपप्रकार येतच राहतील; परंतु जोपर्यंत आपण सर्व खबरदारी घेऊ तोपर्यंत चिंता करण्याचे कारण नाही. देशात चौथी लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे, असे डॉ. मिश्रा यांनी म्हटले आहे.
ओमिक्रॉन आणि त्याचे उपप्रकाराची लागण लसीकरण केलेल्या कोणत्याही व्यक्तीला किंवा ज्यांना नैसर्गिक संसर्ग झाला आहे, त्यांना पुन्हा लागण होऊ शकते. लागण झाली तरी रोगाची तीव्रता अत्यंत कमी असेल. तसेच बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणे नसतील किंवा अतिशय सौम्य लक्षणे असतील. मात्र आजारी पडल्यास ते गांभीर्याने घेतले पाहिजे; कारण कोरोनाचे नवीन उपप्रकार येत आहेत आणि धोकादायक ठरू शकतात. याच कारणासाठी जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याची गरज आहे, कारण नवीन संक्रमणांमागे एक धोकादायक उपप्रकार असू शकतो. जिनोम सिक्वेन्सिंगचे प्रमाण कधीही कमी करता कामा नये, असा सल्ला मिश्रा यांनी दिला.
चौथ्या लाटेची शक्यता कमी आहे; परंतु गाफील राहून चालणार नाही. कोरोनाचा धोका कमी झाला आहे, असे समजून नागरिकांनी कोविडविषयक खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. अनेकजण मास्क, सामाजिक अंतर राखणे, यासारखे मूलभूत नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. हे एक प्रकारे संक्रमणाला आमंत्रण देण्यासारखेच आहे, असेही मिश्रा म्हणाले.