आपला संघ आक्रमक खेळावर भर देणार असून जिंकण्यासाठीच मैदानावर उतरणार आहे. एफसी गोवाने एक बॅ्रँड फुटबॉल खेळण्यासाठी तयारी केलेली असून संघ केवळ विजयासाठीच खेळेल असा विश्वास एफसी गोवाचे नवीन स्पेनीश मुख्य प्रशिक्षक सेर्जिओ लोबेरा यांनी बांबोळी ऍथलेटिक स्टेडियवर आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आपला संघ बचावात्मक खेळावर भर देणार नसून फुटबॉल घेऊन आक्रमण करणे हेच आमचे ध्येय असेल. तुम्ही चेंडू कितीवेळा पास करता हे महत्त्वाचे नसते तर फुटबॉलमध्ये तुम्ही किती वेळा गोलपोस्टमध्ये टाकता हे महत्त्वाचे आहे. सामन्यात तुम्ही हजार पासेस करता. परंतु एका गोलने सामना गमवता. त्यामुळे फुटबॉल हा पासेसचा आकडा नाही, तर किती वेळा गोल करता महत्त्वाचे आहे, असे सेर्जिओ म्हणाले.
आपल्या संघातील खेळाडू हे केवळ गोल करण्यासाठीच नसतील. तर मला माझ्या खेळाडूंकडून गोल करण्याबरोबरच सांघिक योगदानाचीही अपेक्षा आहे. मला संघात आक्रमकता आणि बचाव या दोन्हींचा समतोल साधायचाय. आमचे मुख्य ध्येय असेल फुटबॉलवर वर्चस्व राखणे. त्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडूंना चेंडूवर नियंत्रण मिळविण्यास न देणे हे महत्त्वाचे असेल, असे सेर्जिओ यांनी सांगितले.
काही खेळाडू सोडल्यास इतर सर्व खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. उर्वरित खेळाडूंही स्पर्धेपूर्वी पूर्ण तंदुरुस्त होतील अशी अपेक्षा आहे. माझ्या खेळाडूंबद्दल मी पूर्ण समाधानी आहे. आयएसएल संपेपर्यंत ते माझ्यासाठी सर्वोत्तम खेळाडू असतील. त्यांना माहीत आहे की, त्यांना माझ्यासाठी सर्वोत्तम द्यायचेय आणि मला खात्री आहे की ते देतील, असा विश्वासही सेर्जिओ यांनी व्यक्त केला.