जाहीर प्रचार थांबला : पोलीस बंदोबस्तात वाढ

0
86

२३ एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभेच्या तीन पोट निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता रविवारी संध्याकाळी ५ वाजता झाली असून उमेदवारांचा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेला जाहीर प्रचार थांबला आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलीस व अबकारी खात्याच्या गस्ती पथकांनी तपासणीला सुरुवात केली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त कुणाल (आयएएस) यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

राज्यात मतदान सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत घेण्यात येणार आहे. राज्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक सुरक्षा योजना हाती घेण्यात आल्या आहेत. नागरिकांनी निवडणुकीच्या काळातील तक्रारीसाठी सी-व्हिजिल ऍपचा वापर करावा. ऍपच्या माध्यमातून तक्रारी अधिकार्‍यापर्यंत लवकर पोहोचू शकतात, असे कुणाल यांनी सांगितले.

‘पेड’ बातमी नाही
लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघातून प्रत्येकी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच विधानसभेच्या तीन मतदारसंघातील पोट निवडणुकीत १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्यात एकूण ११ लाख ३५ हजार ८११ मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या जास्त आहे. महिला मतदारांची संख्या ५ लाख ८० हजार ०४३ एवढी असून पुरुष मतदारांची संख्या ५ लाख ५५ हजार ७६८ एवढी आहे.
राज्यातील प्रत्येक मतदारसंघात १ मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी एक मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. दिव्यांग मतदारांना मतदानाच्या वेळी साहाय्य करण्यासाठी दोन स्वयंसेवक नियुक्त केले आहेत. तसेच मतदान केंद्र अधिकारी सुध्दा मदत करतील. सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. ब्रेल मतदान पत्रिका उपलब्ध करण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी एका मतदान केंद्रावर केवळ महिला कर्मचार्‍याची नियुक्ती केली जाणार आहे, असे कुणाल यांनी सांगितले.

निवडणूक आचारसंहितेच्या काळात आत्तापर्यंत ११.६४ कोटी रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यात रोख रक्कम, दारू, अमलीपदार्थ व इतर वस्तूंचा समावेश आहे. मुख्य निवडणूक कार्यालयाकडे आचारसंहिता भंगाच्या ५४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील ३६ तक्रारी निकालात काढण्यात आल्या आहेत. तर १८ तक्रारी प्रलंबित आहेत. सी-व्हीजिल ऍपच्या माध्यमातून केवळ ३३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पेड बातमीबाबत एकही प्रकार आढळून आला नाही, असेही कुणाल यांनी सांगितले.
राज्यात एकूण ४७ असुरक्षित, संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जादा पोलीस कुमक आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्यभरात स्थानिक पोलिसांबरोबरच केंद्रीय राखीव दल आणि केरळ राज्य राखीव पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याबाहेर पोलिसांच्या १२ कंपन्या सुरक्षेसाठी कार्यरत आहेत. राज्याच्या सीमेवरीवर नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी दिली.
निवडणुकीच्या काळात दारूच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी २१ गस्ती पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.