जामिनाची मुदत 7 दिवसांनी वाढवा

0
9

>> अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. त्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी 1 जूनपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला आहे. 2 जून रोजी त्यांनी पुन्हा आत्मसमर्पण करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. मात्र, आता अरविंद केजरीवाल यांनी जामिनाची मुदत 7 दिवसांनी वाढवावी, अशी मागणी केली असून, या संदर्भात त्यांनी काल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

वैद्यकीय कारणांमुळे जामिनाची मुदत 7 दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. मागील काही दिवसांत माझे वजन 7 किलोंनी कमी झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मला काही वैद्यकीय चाचण्या करण्यास सांगितल्या आहेत. यामध्ये पेट-सीटी स्कॅनचाही समावेश आहे. त्यामुळे मला जामिनाची मुदत 7 दिवसांसाठी वाढवून द्यावी, असे केजरीवाल यांनी या याचिकेत म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीतील मॅक्स रुग्णालयातील वैद्यकीय चमुने या संदर्भातील प्राथमिक चाचण्या पूर्ण केल्या असूनख या वैद्यकीयदृष्ट्‌‍या चाचण्या करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, असे केजरीवाल यांनी याचिकेत नमूद केले आहे.

दरम्यान, दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 10 मे रोजी अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. तसेच 2 जून रोजी त्यांनी ईडीकडे आत्मसमर्पण करावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले होते. अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केल्याने भाजपासह अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. केजरीवाल यांना न्यायालयाने विशेष सवलत दिली, असा आरोप त्यांनी केला होता.