204 किलो अमली पदार्थ जप्त, 197 जणांना अटक
राज्यात 1 जानेवारी 2023 ते 21 डिसेंबर 2023 या कालावधीत अंदाजे 8.38 कोटी रुपयांचे 204 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून 197 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यातील पोलीस यंत्रणा अमली पदार्थाच्या विषयावर गंभीर आहे. पोलीस दलाच्या अमली पदार्थ विभाग आणि विविध पोलीस स्टेशनकडून अमली पदार्थ प्रकरणी कारवाई केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी अमली पदार्थ व्यवहार करणाऱ्यांना थारा देऊ नये. पोलीस यंत्रणेकडून जप्त करण्यात येणारा अमली पदार्थ कुंडई येथील वैद्यकीय कचरा प्रकल्पात विल्हेवाट लावली जाते, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यात पर्यटकांना लुबाडण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. डान्स बारमध्ये पर्यटकांची लुबाडणुकीची घटना घडल्यास डान्स बारचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. सरकारची पोलीस यंत्रणा बेकायदा वेश्या व्यवसायाबाबत गंभीर असून आवश्यक ठिकाणी कारवाई केली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
16 लाखांचे ड्रग्ज जप्त
गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने पणजी आणि गिरी येथे छापा घालून दोघांना अटक करून त्यांच्याकडून अंदाजे 16 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी लुईस फर्नांडिस (गिरी) आणि सुलेश सदयाळ (गोवा वेल्हा) यांना अटक केली आहे.