जानेवारीत ९३६१ नवीन मतदारांची नोंदणी

0
8

>> निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती

>> प्रचारसभांसाठी ४९० जागांची यादी

राज्यभरात विधानसभा निवडणूक प्रचारसभांसाठी ४९० जागांची एक यादी तयार करण्यात आली आहे. राजकीय पक्षांना प्रचारसभांसाठी आणखी जागांची नावे सुचविण्याची सूचना करण्यात आली आहे. राजकीय पक्षांकडून जागांची नावे सादर केल्यानंतर प्रचारसभांसाठी अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल (आयएएस) यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

राज्यातील मतदार यादीमध्ये जानेवारी २०२२ या महिन्यात ९३६१ नवीन नावांचा समावेश करण्यात आला असून राज्यातील मतदारांची एकूण संख्या ११.६४ लाख एवढी झाली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली.

१७२२ मतदान केंद्रे
राज्यात मतदान केंद्रांवर गर्दी टाळण्यासाठी १७२२ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ६७६ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. २९८ सेवा मतदार पोस्टल मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करणार आहेत.

राज्यात ८० वर्षांवरील २९ हजारांवर मतदार
राज्यात ९५९० दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आली असून २९ हजार ७९७ मतदार ८० वर्षांवरील आहेत. राज्यात प्रथमच ४१ सेक्स वर्कर्स आणि ९ ट्रान्सजेंटर मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे, असेही मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी सांगितले.
राज्यातील ८० वर्षांवरील सुमारे १३ हजार २८४ मतदारांनी घरातून मतदान करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यात उत्तर गोव्यातील ५९३८ आणि दक्षिण गोव्यातील ७३४६ ज्येष्ठ मतदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी घरातून मतदानासाठी अर्ज केलेल्या मतदारांच्या घरांना भेट देऊन पाहणी करणार आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी सांगितले.

१०.१३ कोटींचा ऐवज जप्त
राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आल्यानंतर आत्तापर्यंत १०.१३ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यात रोख ६.३० कोटी, मद्य २.४४ कोटी, अमलीपदार्थ १.०६ कोटी चा समावेश आहे. राज्यभरात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी हाताळण्यासाठी ८१ गस्ती पथके कार्यरत आहेत. गस्ती पथकांना ३९८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आचारसंहिता भंगप्रकरणी ३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे, असेही कुणाल यांनी सांगितले.
निवडणूक प्रचाराच्या वेळी घरांवर उमेदवारांचे पोस्टर चिकटविणे आचारसंहितेचा भंग होत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर संबंधित उमेदवारावर कारवाई केली जाणार आहे. निवडणूक प्रचारात सहभागी सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे, असेही कुणाल यांनी सांगितले.