>> गुंतवणूकदारांना घातला ३ कोटींचा गंडा
गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना सुमारे ३ कोटी रुपयांना गंडा घालणार्या मे. युदिओ या खासगी कंपनीचा प्रमोटर सुभाष चंद्रा (४३) याला नवी दिल्ली येथे अटक करून गोव्यात आणले आहे. संशयित सुभाष चंद्रा याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
या कंपनीने फातोर्डा मडगाव येथे कार्यालय सुरू केले होते. या कंपनीने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आर्थिक गुंतवणूक योजना कार्यान्वित केल्या होत्या. या योजनांकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी जादा व्याज देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या कंपनीच्या आर्थिक योजनामध्ये दक्षिण गोव्यातील अनेकांनी गुंतवणूक केली होती. तथापि, गुंतवणूक केलेल्या रकमेची मुदत पूर्ण झाल्यानंतर रक्कम परत न मिळाल्याने गुंतवणूकदारांना कंपनीबाबत संशय निर्माण झाला. या कंपनीच्या विरोधात ८ जून २०२२ रोजी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. गुंतवणूकदारांनी या कंपनीचा संचालक विजयकुमार जयस्वाल, त्याची पत्नी व्यवस्थापकीय संचालक रश्मी जयस्वाल, प्रमोटर सुभाष चंद्रा आणि गोव्यातील ९ एजंटांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी कंपनीचा संचालक विजयकुमार जयस्वाल याला यापूर्वी अटक करण्यात आलेली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
बँक सेवा, ऑनलाईन शॉपिंग, लॉटरी, चॅटिंग ऍप डाऊनलोड, विमान व टुरिझम सेवांचे आमिष दाखवून १२ जणांना ७.३२ लाख रूपयांचा गंडा घालण्यात आला आहे.