जातीय तेढ थांबवा; सामाजिक सलोखा राखा

0
7

>> विरोधी पक्षांचे नेते, आमदारांची राज्यपालांकडे निवेदनातून मागणी; राजभवनात घेतली भेट

राज्यातील विरोधी पक्षांचे नेते आणि आमदारांच्या एका शिष्टमंडळाने दोनापावल येथील राजभवनामध्ये काल राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना राज्यातील जातीय तेढ थांबवून सामाजिक सलोखा कायम ठेवावा या मागणीसाठी, तसेच आदिवासींना राजकीय आरक्षणासाठी आवश्यक जनगणनेसाठी हस्तक्षेप करावा, या मागणीसाठी काल एक निवेदन सादर केले. विरोधी पक्षांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन राज्य सरकारकडे संबंधित विषयांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळाला दिले, अशी माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना
दिली.

राज्यपालांना भेटीस गेलेल्या शिष्टमंडळामध्ये विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासमवेत काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा, आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, क्रूझ सिल्वा, आरजीचे आमदार विरेश बोरकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर, शिवसेनेचे जितेश कामत, तृणमूलचे समिल वळवईकर आदींचा समावेश होता. दरम्यान, राज्यपालांना भेटलेल्या विरोधकांच्या शिष्टमंडळात गोवा फॉरवर्डचा समावेश नव्हता.

राज्यातील सामाजिक सलोखा सोशल मीडियावरील धर्मविरोधी आक्षेपार्ह संदेशामुळे धोक्यात आला आहे. भाजप सरकार सामाजिक सलोखा कायम राखण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्यपालांच्या नजरेस ही बाब आणून देण्यात आली आहे. राज्यात समाजात फूट घालणाऱ्या शक्ती कार्यरत झालेल्या आहेत. त्यांच्याविरोधात योग्य कारवाई होत नाही, असा आरोपही युरी आलेमाव यांनी यावेळी बोलताना केला.