- सौ. प्राजक्ता प्र. गावकर
शिवाजीराजे शूर, पराक्रमी व नीतिमंत होते. नावलौकिक, विजयश्री मिळवत राजांनी अन्याय करणाऱ्यांचे हात मुळापासूनच उपटले आणि स्वराज्य स्थापन केले. स्वतःच्या जिवाशी खेळून प्रजेचे रक्षण करणारा हा आपला जाणता राजा. तो कुणापुढेही कधी नमला नाही. नेहमी ताठ मानेनेच राहिला. त्यांचा 19 फेब्रुवारी हा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण…
सिंदखेडचे मालोजी भोसले व दीपाबाई यांच्या पोटी शहाजीराजांचा जन्म 18 मार्च 1594 साली सिंदखेड येथे झाला. ते अहमदनगरच्या निजामाच्या पदरी सरदार होते. त्यांचा विवाह जिजाबाईंबरोबर लहान वयातच झाला होता. जिजाबाई या सिंदखेडचे लखुजी जाधव व म्हाळसाबाई यांच्या कन्या. त्यांचा जन्म सिंदखेड येथे 12 जानेवारी 1598 साली झाला. त्यांचा विवाह शहाजीराजांबरोबर 1605 साली दौलतबाग येथे झाला.
त्यांना एकूण पाच मुलगे; पण त्यातले दोघेच वाचले. संभाजी व शिवाजी भोसले. शिवाजीराजांच्या जन्माच्या वेळी म्हणजे जिजाबाई गरोदर असताना त्यांना त्यांच्या काळजी घेणाऱ्या सख्या विचारत, ‘काय खावंसं वाटतं? कसले डोहाळे लागले आहेत?’ तेव्हा जिजाबाई म्हणाल्या, ‘एवढ्यांदा गरोदर राहिले, पण असा अनुभव आला नाही कधी. यावेळी मात्र मला घोड्यावरून रानावनात दौडत जावेसे वाटते. दांडपट्टा चालवावा असे वाटते. तलवारीने शत्रूला कापून काढावेसे वाटते. नवनव्या किल्ल्यांवर आपला केसरी ध्वज फडकवावा असे वाटते.’ तेव्हा त्यांची सखी त्यांना म्हणाली, ‘खरेच आऊसाहेब, तुमच्या अंगावर एक वेगळेच तेज विलसत आहे. असे वाटते की कुणीतरी दैवीशक्ती आपल्या पोटी येणार आहे.’ तिचे बोलणे ऐकून आऊसाहेबांनी देवाला हात जोडले व त्या म्हणाल्या, ‘देवी शिवाई, मी तुला नवस बोलले आहे तो पुरा कर. मला कर्तव्यदक्ष व बलवान असा पुत्र दे, जो माझी मनोकामना पूर्ण करील!’ त्याच रात्री जिजाऊंच्या स्वप्नात देवी आली व तिने त्यांना तथास्तू असा आशीर्वाद दिला.
आऊसाहेबांना आता नववा महिना सुरू झाला. त्यांच्याकडे लक्ष पुरवण्यासाठी खूप दासी होत्या. जसजसा प्रसूतीचा क्षण जवळ येत होता तसतशी साऱ्यांची उत्सुकता वाढत होती. देवीवर सतत अभिषेक चालू होता. आऊसाहेबांच्या महालात चंदन शिंपडले गेले. आता आऊसाहेबांना अंगावरचे दागिनेही जड वाटू लागले. पूर्ण दिवस भरले आणि 19 फेब्रुवारी 1630 साली सूर्यास्ताच्या वेळी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक असलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर आऊसाहेबांनी एका गोंडस पुत्ररत्नाला जन्म दिला. बालमुख पाहून आऊसाहेबांसकट सारे हरकून गेले.
यथावकाश थाटात बारसे करण्यात आले व बाळाचे नाव शिवाई देवीच्या कृपेने झाल्यामुळे ‘शिवाजी’ असे ठेवण्यात आले. बाल शिवाजी हळूहळू मोठा होत होता. त्यांचे मोठे बंधू संभाजी हे आपल्या वडिलांबरोबर राहत होते, तर राजे आपल्या आईजवळ राहत होते. राजे आऊसाहेबांना ‘माँसाहेब’ म्हणत. आऊसाहेब त्यांना रामायण-महाभारतातल्या गोष्टी सांगत. त्यातले नायक खलनायकाला का व कसे मारतात ते पटवून सांगत. न्याय व अन्याय पटवून दाखवत. अन्याय खपवून घ्यायचा नाही म्हणून शिकवत. धर्मरक्षा तशी न्याय आणि नीती असे त्यांना शिकवत. माँसाहेबांनी राजेना परस्त्रीचा आदर करायला शिकवले.
शिवबा लहान असताना आपल्या सवंगड्यांबरोबर लुटूपुटूची लढाई करून गड जिंकत असे व आपण राजा होत असे. त्याचे मित्र मावळे होत. बालवयातच त्यांचे हे प्रताप पाहून बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे वाटे. आऊसाहेबांच्या मनाला समाधान वाटे. बालवयातच केवळ 14 व्या वर्षी त्यांनी आपल्या सवंगड्यांसोबत रोहिडेश्वराच्या देवळात जाऊन आपली करंगळी कापून आपल्या रक्ताचा अभिषेक शिवलिंगावर केला आणि स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. यवनांनी पुणे भस्म केले होते तेव्हा राजांनी पुण्याच्या जमिनीत सोन्याचा नांगर फिरवून पुणे पुन्हा उभे केले.
शिवरायांच्या पहिल्या गुरू त्यांच्या मातोश्रीच होत. राजे स्वभावाने प्रेमळ असल्याने त्यांचे मित्रही खूप होते. कान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी मालुसरे, हंबिरराव मोहिते हे शिवरायांचे बालसवंगडी. त्यांनी आपल्या राजांची शेवटपर्यंत साथ सोडली नाही. नेताजी पालकर, हंबिरराव मोहिते, प्रतापराव गुजर, खंडेराव कदम हे राजांचे सरसेनापती होते. किल्ले सर करताना त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. राजांनी वयाच्या सतराव्या वर्षी पहिला तोरणागड जिंकला व स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणागड हा स्वराज्याचे तोरणच ठरला. त्याच साली राजांनी कोंढाणा व पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकले. कोंढाणा घेताना राजांना आपले परम मित्र तानाजी मालुसरे यांना मुकावे लागले.
इ.स. 1659 पर्यंत शिवरायांनी जवळपास पश्चिम घाटातले आणि कोकणातले मिळून चाळीस किल्ले जिंकले होते. आपल्या ताब्यातील किल्ले शिवरायांनी जिंकले म्हणून आदिलशहा खूप संतापला होता. त्याने राजांना मारायला आपल्या दरबारात विडा ठेवला. तो विडा अफझल खानाने उचलला. त्याने आदिलशहासमोर प्रतिज्ञा केली की, आपण शिवाजीचे डोके छाटून आपल्यासमोर आणीन. त्याप्रमाणे तो शिवाजीराजांना भेटायला गेला. राजा ज्या गडावर होते त्या गडाच्या पायथ्याशी अफझल खान तळ ठोकून होता. त्याच्या तळापासून गडापर्यंत मध्यजागा होती तिथे सुंदर शामियाना तयार केला गेला. अफझल खानने स्वतः जाऊन शामियान्याची पाहणी केली होती. का तर इथे काही दगाफटका नाही ना हे त्याने पडताळून पाहिले होते. ठरलेल्या दिवशी तो शामियान्यात राजांची वाट पाहत बसला. आपला राजा वचनाला जागणारा होता. राजांनी अफझल खानाला भेटायला जायचे ठरवले. राजांनी अंगावर चिलखत चढवले. वाघनखे बोटात घातली. बिचवा जवळ बाळगली.
अफझल खानाने सांगितले होते की, प्रत्यक्ष भेटीच्या वेळी शस्त्र आणायचे नाही. पण राजांना यवनांची करणी माहीत होती. आपल्याला शस्त्र आणू नकोस म्हणून सांगणारा अफझल खान स्वतः मात्र निःशस्त्र येणार नाही याची खात्री होती. परंतु राजा आले. शामियान्याजवळ येताच त्यांनी आपली तलवार आपल्या विश्वासू सेवकाकडे दिली आणि ते आत गेले. राजांना पाहताच अफझल खानाने त्यांना मिठी मारली आणि त्यांचे डोके आपल्या बगलेत पकडले. अफझल खान उंच आणि धिप्पाड होता. याउलट राजे ठेंगू आणि मध्यम देहयष्टी असलेले. राजांचे डोके जेव्हा अफझल खानाने बगलेत पकडले तेव्हा राजांना याची चाल कळली. अफझल खानने खंजिराचा घाव राजांच्या पाठीवर केला. पण चिलखतामुळे राजांचे प्राण वाचले. अफझल खानचा दगा पाहून राजांनी आपली वाघनखे त्याच्या पोटात खुपसून त्याचा कोथळाच बाहेर काढला. त्याबरोबर तो खान मोठ्याने किंचाळला. तेव्हा त्याच्याबरोबर असलेल्या दांडपट्टेवाल्याने शिवरायांवर दांडपट्टा चालवला. शिवरायांच्या विश्वासू सेवकाने- जिवा महालाने- तो वार स्वतःवर झेलला व महाराजांचे प्राण वाचवले. यासाठी एक म्हण तयार झाली- ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा.’
राजे म्हणजे एक उत्तम व्यक्तिमत्त्व होते. आपल्या खाजगी आयुष्यात त्यांनी आठ लग्ने केली. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई व गुणवंतीबाई या त्यांच्या बायका. या साऱ्या बायकांमध्ये सईबाई, सोयराबाई व पुतळाबाई या तीन राण्या प्रमुख होत्या.
शिवाजीराजांना सईबाईंपासून संभाजी व सोयराबाईंपासून राजाराम हे दोन सुपुत्र झाले. संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन करणाऱ्या या शिवरायांच्या महान कारकिर्दीला ‘शिवकाल’ असे म्हणतात. राजांनी एकापाठोपाठ एक किल्ले सर करत आदिलशहाचे धाबे दणाणून सोडले. या कारणास्तव आदिलशहाने राजांना पकडण्यासाठी जंग जंग पछाडले, पण राजे त्याच्या हाताला लागत नव्हते. आदिलशहाने आपल्या सरदारांना राजांचा पत्ता लावण्याचा हुकूम सोडला. शेवटी आदिलशहाचा एक सरदार सिद्धी जोहार याला राजांचा पत्ता लागला. राजे त्यावेळी पन्हाळगडावर होते. सिद्धीने गडाला वेढा दिला. यावेळी एक-दोन नव्हे तर तब्बल सहा महिने शिवरायांना गडावर राहावे लागले. आधी खूप कडक पहारा ठेवण्यात आला, पण नंतर वेढा हळूहळू सैल झाला आणि एके दिवशी राजे पन्हाळगडावरून आपल्या विश्वासू सहकाऱ्याबरोबर निसटले. त्यावेळी शिवा काशीद नावाचा एक विश्वासू सेवेकरी तेथे होता. त्याने महाराजांचा वेश घेतला. कारण तो हुबेहूब महाराजांसारखाच दिसत होता.
तो महाराज होऊन तेथे राहिला आणि महाराज तिथून विशाळगडावर निघाले. सिद्धी जोहारला राजा निसटले हे माहीतच नव्हते. जेव्हा त्याला समजले तेव्हा त्याने गडावर जाऊन शिवा काशिदला ठार केले व राजांचा पिछा केला. तोपर्यंत राजा घोडखिंडीजवळ पोचले होते. रात्रभर रपेट करून ते थकले होते. आता ही घोडखिंड पार केली की विशालगडावर पोचलो असे वाटत असतानाच सिद्धी जोहारचे सैन्य तिथपर्यंत येऊन पोचले आणि घनघोर युद्ध सुरू झाले. काही केल्या सिद्धी जोहारचे सैन्य मागे हटायला तयार होईना. तशातच पावसाळी रात्र. राजांच्या जिवाला धोका होता. राजांचे बालसवंगडी बाजीप्रभू देशपांडे त्यांना म्हणाले, ‘महाराज, आपण विशाळगडावर जावे. मी येथे थांबून शत्रुसैन्याला थोपवून धरतो. आपण विशाळगडावर पोहोचताच तोफेचे तीन गोळे झाडावे, मग मी समजेन की आपण सुखरूप गडावर पोहोचलात. तेव्हा निघावे महाराज.’ असे म्हणून त्यांनी राजांना सलाम केला.
आपल्या वीर मित्राला छातीशी कवटाळून राजे विशाळगडाकडे निघाले. थोड्याच वेळात सिद्धी जोहार तिथे येऊन पोचला. पुन्हा घनघोर युद्ध सुरू झाले. बाजीप्रभू देशपांडेंनी शत्रुसैन्याला एक पाऊलसुद्धा पुढे टाकू दिले नाही. त्या युद्धात बाजीप्रभू खूप जखमी झाले. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू फुलाजीही होते. तेसुद्धा आपल्या प्राणाची बाजी लावून युद्ध करत होते. बाजीप्रभू दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन लढत असताना त्यांचे प्राण कंठाशी आले. तेवढ्यात तोफेचे तीन गोळे झाडल्याचे आवाज आले आणि बाजीप्रभूंनी ओळखले, राजे विशालगडावर सुखरूप पोचले! मग मात्र बाजीप्रभू कोसळले. त्यांची प्राणज्योत मालवली. बाजीप्रभूंनी घोडखिंडीत आपल्या प्राणांचे बलिदान दिले म्हणून महाराजांनी त्या खिंडीचे नाव ‘पावनखिंड’ असे ठेवले. बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन झालेली ती खिंड पावनखिंड. त्याच दरम्यान शिवाजीराजांनी पुरंदरच्या तहात असलेले तेवीस किल्ले जिंकून घेतले. आपले स्वराज्याचे स्वप्न साकार करताना राजांना आपल्या बालमित्रांना गमवावे लागले.
इ.स. 6 जून 1674 साली शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्यांना ‘छत्रपती’ ही पदवी देण्यात आली. राजे स्त्रियांचा आदर करीत. परस्त्री मातेसमान मानीत. तशी आऊसाहेबांची त्यांना शिकवणच होती. जेव्हा सुरतच्या लुटमारीच्या वेळी कल्याणच्या सुभेदाराची सून लुट म्हणून राजेसाहेबांना देण्यात आली त्यावेळी ती सुभेदाराची सून आता आपले काय होईल या भीतीने खूप घाबरली होती. पण राजांनी तिला साडीचोळी देऊन तिची मोठ्या दिमाखात परत पाठवणी केली आणि ज्या कुणी हे कृत्य केले त्यांना जबर शिक्षा दिली.
शिवरायांचा राज्याभिषेक व्हायच्या आधी पाच-सहा वर्षांपूर्वी शहाजीराजे घोड्यावरून पडले. हे दुखणे अखेरचे ठरले. 23 जानेवारी 1668 साली राहत्या घरीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी, जिल्हा दावणगिरी, कर्नाटक येथे आहे. पतीचे निधन झाले हे समजल्यावर आऊसाहेब सती जाण्याची तयारी करू लागल्या तेव्हा महत्प्रयासाने शिवरायांनी त्यांना रोखले आणि तेव्हापासून सतीची प्रथा बंद करण्यात आली.
सर्व महाराष्ट्र जिंकून सर्वत्र भगवा ध्वज फडकतो आहे, आपल्या मनासारखे सर्वकाही झालेले पाहून राजमाता जिजाऊसाहेबांनी धन्य होऊन वयाच्या 80 व्या वर्षी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी अखेरचा श्वास घेतला. त्या पाचाड या गावी आपल्या नातेवाइकांकडे काही कार्यासाठी त्या आल्या होत्या. काही त्रास होऊन त्या आजारी पडल्या होत्या. राजांनी त्यांना गडावर नेण्याची व्यवस्थासुद्धा केली, पण त्या तिथेच राहिल्या. पाचाड या गावी जिथे अखेरचा श्वास घेतला तिथेच त्यांची समाधी आहे.
राजे शूर, पराक्रमी, नीतिमंत होते. नावलौकिक, विजयश्री मिळवत राजांनी अन्याय करणाऱ्यांचे हात मुळापासूनच उपटले आणि स्वराज्य स्थापन केले. स्वतःच्या जिवाशी खेळून प्रजेचे रक्षण करणारा हा आपला जाणता राजा. तो कुणापुढेही नमला नाही. ताठ मानेनेच राहिला.
असा हा आपला राजा वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी 3 एप्रिल 1680 साली रायगडावर आजारी पडून मृत्यू पावला. आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे प्रजेला जपणारा राजा गेला… एक सूर्य उगवला आणि अवघ्या महाराष्ट्राचा हा तळपता सूर्य लोप पावला. जय भवानी, जय शिवाजी!