आज गुरुवार दि. २७ नोव्हेंबर ते रविवार दि. ३० पर्यंत मुरगाव बंदरात चार विदेशी जहाजांचे आगमन होणार असून जहाज कर्मचार्यांसह एकूण ४६०० विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होणार आहेत. त्यासाठी एमपीटी, राज्य पर्यटन खाते आणि मे. जे. एम. बक्शी कंपनीचे अधिकारी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.यंदाच्या मोसमाला गेल्या आठवड्यात मुरगाव बंदरात दाखल झालेल्या ‘आयडासोल’ या जहाजाने पर्यटकांच्या आगमनास प्रारंभ झाला असून या जहाजातून दोन हजारांवर प्रवासी आणि ६०० जहाज कर्मचारी गोव्यात दाखल झाले होते. गोव्यात सागरी पर्यटनाला अनन्य साधारण महत्त्व देण्याकरिता मुरगाव बंदरात पर्यटक जहाजांसाठी खास धक्का बांधण्यात आला आहे. तसेच केंद्रीय पातळीवरून यासाठी पुढाकार घेतला आहे.
गुरुवार दि. २७ रोजी सकाळी ७ वाजता दुबईहून आलेली ‘आयडा आवरा’ जहाज मुरगाव बंदरात दाखल होणार आहे. हे जहाज मुंबई-मेंगलोर मार्गे गोव्यात दाखल होत असून तद्नंतर ते गोव्यातून मस्कतला रवाना होईल. सदर जहाजातून ११७५ प्रवासी आणि ४०५ जहाज कर्मचारी गोव्याच्या सहलीसाठी येत आहेत. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता हे जहाज मस्कतला रवाना होणार आहे.
शुक्रवार दि. २८ रोजी ‘आझमारा क्टोस्ट’ हे जहाज दुपारी साडेबारा वाजता जवळ जवळ हजारावर प्रवाशांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे. मस्कत, फुजेरा, मुंबई असा प्रवास करून ते जहाज गोव्यात दाखल होणार असून त्यानंतर गोव्यातून कोचीनला प्रयाण करतील. या जहाजात ६१० प्रवासी आणि ३९५ कर्मचारी आहेत. शनिवार दि. २९ रोजी ‘सेव्हन सीज वोयेज’ हे जहाज ६७५ प्रवासी आणि ४०० कर्मचार्यांसह मुरगाव बंदरात दाखल होणार आहे. मस्कत, ओमान, मुंबई असा प्रवास करून गोव्यात मुरगाव बंदरात येणार आहे. त्यानंतर मंगळूर, कोचीन, मालदीव येथे प्रवासासाठी जहाज निघणार आहे.
रविवार दि. ३० रोजी ‘नॉटीला’ हे प्रवासी जहाज ९५० विदेशी पर्यटकांना घेऊन दुबई, आबूधाबी, फुजेरा, मस्कत, मुंबई असा प्रवास करून मुरगाव बंदरात आगमन करेल. त्यानंतर गोव्यातून त्याच दिवशी ते जहाज मंगळूरला प्रयाण करेल.
गुरुवारपासून गोव्यात दाखल होणारी ही जहाजे ८ ते १० तासातच मुरगाव बंदरात थांबणार असून विदेशी पर्यटकांना ही गोव्याची धावती भेट असणार आहे. वास्को येथील मे. जे. एम. बक्शी या कंपनीमार्फत ही जहाजे गोव्यात आणली जात आहेत.